सिडकोत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा

सिडकोत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा

नवी मुंबई : सिडको कर्मचारी कल्याणकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत सिडकोतील कर्मचाऱ्यांना निवासासाठी देण्यात आलेला नेरूळ सेक्‍टर- 40 मधील कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड एका विकासकाने सिडकोतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदा बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सिडकोने या प्रकरणात सहभागी असलेल्या सिडकोच्या वसाहत विभागातील आजी-माजी कर्मचारी अधिकाऱ्यांवर तसेच भूखंड बळकावणारा विकासक अशा एकूण 11 जणांवर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


सिडको महामंडळात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण संस्थासाठी भूखंड देण्याचे सिडकोचे धोरण असल्याने सिडकोमधील 32 कर्मचाऱ्यांनी 1993 मध्ये स्नेहपुष्प गृहनिर्माण संस्था स्थापन करून सिडकोकडे भूखंडाची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सिडकोने फेब्रुवारी 2002 मध्ये तत्कालीन प्रचलित धोरणानुसार या गृहनिर्माण संस्थेला भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार व लीज ऑफ लॅन्ड को-ऑप. हौ. सोसायटी अधिनियम 1999 च्या तरतुदींना अधिन राहून 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर नेरूळ, सेक्‍टर- 40 मधील 9 व 10 हा भूखंड 73 लाख 79 हजार रुपयांमध्ये दिला. दरम्यानच्या काळात सिडकोच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना निवासासाठी देण्यात आलेला भूखंड खासगी विकासकाच्या नावाने हस्तांतर झाल्याने सिडकोच्या वतीने या भूखंडवाटपाची चौकशी करण्यात आली. 
या चौकशीत सदर भूखंडाच्या भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तींचा तसेच लीज ऑफ लॅन्ड को-ऑप. हौ. सोसायटी अधिनियमांतील तरतुदींचा भंग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिडकोने या प्रकरणाची सखोल तपासणी केल्यानंतर सिडकोसोबत झालेल्या भाडेपट्टा करारनाम्यानुसार तत्कालीन वसाहत विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सिडकोच्या धोरणाविरुद्ध सिडको कर्मचारी नसलेल्या बाह्य त्रयस्त व्यक्ती हरिश नागजी छेडा याला सोसायटीचे अतिरिक्त सभासद केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सदर गृहनिर्माण संस्थेवरील सभासद असलेल्या सिडको कर्मचाऱ्यांचे राजीनामे मंजूर करून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सिडकोचे कर्मचारी नसलेल्या बाहेरील 30 व्यक्तींना सभासदत्व हस्तांतरित करण्यात आल्याचे आढळून आले. 

ही बातमी वाचा ः मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द
त्याचप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या तत्कालीन सहनिबंधकांनीदेखील त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करून बेकायदा स्नेहपुष्प को-ऑप. हौ. सोसायटीला वाटप झालेला भूखंड विकासक मे. शहा ऍन्ड छेडा होम्स प्रा. लि. याला विकण्याची परवानगी दिल्याचे तसेच सदर भूखंड मे. शहा ऍन्ड छेडा होम्स विकासकाला हस्तांतरित केल्याचे आढळून आले. तसेच सिडकोतील कर्मचाऱ्यांसाठी वाटप करण्यात आलेला नेरूळ येथील भूखंड फक्त निवासी वापराकरिता असतानादेखील सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकाने तत्कालीन सिडको अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती सादर करून सदर भूखंडावरील चटईक्षेत्र वाढवून घेतले. तसेच भूखंडाचा वापर निवासीऐवजी निवासी व वाणिज्य असा मंजूर करून घेतल्याचे आढळून आले. 

यांचा गुन्ह्यात सहभाग 
या सर्व भूखंड गैरव्यवहारात भूखंड बळकावणारा विकासक हरिष नागजी छेडा तसेच सिडकोच्या वसाहत विभागातील तत्कालीन व्यवस्थापक शहर सेवा अधिकारी विवेक मराठे, लिपिक विजय म्हात्रे, तत्कालीन क्षेत्राधिकारी अरुण देशमुख, सहायक वसाहत अधिकारी एस. एस. नाईक, वसाहत अधिकारी एस. के. देशमुख, डी. ए. करंदीकर, रामचंद्र वेटा, पी. एन. भगत, अरुण देशमुख, बी. पी. राठोड यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. तसेच या सर्वांनी कायद्याचे उल्लंघन करून सिडकोच्या कर्मचाऱ्यांना दिलेला भूखंड बेकायदेशीररीत्या विकासकाला हस्तांतरित करून सिडकोचे तब्बल 70 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आढळून आले. त्यामुळे सिडकोचे वरिष्ठ विकास अधिकारी फैय्याज खान यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सिडकोतील आजी-माजी 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तसेच भूखंड बळकावणाऱ्या विकासकासह एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com