सीएनजी पुरवठा खंडीत झाल्याने मुंबईकरांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सीएनजी गॅस पुरवणारे पंप बंद पडल्याने सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत ही परिस्थिती राहणार असल्याचे ओएनजीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई : ओएनजीसीच्या उरण ते वडाळा या गॅस पाईप लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी (ता.16) सीएनजीचा पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी, शुक्रवारी संध्याकाळी सीएनजीचे 6 पंप बंद पडले. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या आॅटो, टॅक्सी, बेस्टच्या बसेस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक आज (शनिवार) ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. हा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.  

सीएनजी गॅस पुरवणारे पंप बंद पडल्याने सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत ही परिस्थिती राहणार असल्याचे ओएनजीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, तोपर्यंत सीएनजीवर चालणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. काल संध्याकाळपर्यंत शहरातील 6 सीएनजी पंप बंद पडले. या परिस्थितीमुळे शहरात एकूण 133 सीएनजी पंपावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.  

ओएनजीसीच्या उरण येथील प्लँटमधून महानगरला गॅस पुरविण्यात येतो. मात्र, अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा अतिशय कमी दाबाने सुरु आहे. घरगुती वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या पीएनजीची सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महानगर गॅस लिमिटेड करत असल्याची माहिती काल सायंकाळी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली होती.

पीएनजी गॅस वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 12 लाख असून सीएनजीवर चालणारी वाहने शहरात 7 लाखांच्या घरात आहेत. सीएनजीच्या पंपाच्या तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती होईपर्यंत, वाहनांना सीएनजी मिळणार नसल्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Mumbai in problem due to CNG supply disruption