

पाली, ता. २१ (वार्ताहर) ः तापमानात वाढ, असह्य उकाड्याबरोबरच जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक कासावीस झाले आहेत. काही ठिकाणी सलग चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होतो. अवकाळी वादळी पाऊस, उष्मालाटेची काहिली त्यात सतत बत्ती गुल होत असल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. वीज गायब झाल्यावर बहुतांश मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कही ठप्प होते. त्यामुळे ऑनलाईन, बॅकिंग व्यवहारासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही फटका बसतो आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले. तब्बल १२० विजेचे खांब कोसळले असून सर्वाधिक घटना कर्जत तालुक्यात त्यानंतर सुधागड, महाड तालुक्यात घडल्या आहेत, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र काही ठिकाणी अशी आहेत, जिथे ना वीजखांब कोसळले ना झाडे-फांद्या, तरीही दिवसातून तीन-चार वेळा वीज गायब होते.
महावितरणकडून अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू असून त्यासाठी शटडाऊन घेतले जात आहे. तर ग्रामीण भागात नियमित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी आठवड्यातून एक दिवस बत्ती गुल असते. त्यानंतरही सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पर्यटन व्यवसायाला फटका
पुण्या-मुंबईपासून जवळचे ठिकाणी म्हणून रायगडला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. सध्या जिल्ह्यातील समुद्रकिनारे तसेच विविध ऐतिहासिक व इतर पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत असून हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था करणाऱ्यांना फटका बसत असल्याचे दिवेआगर येथील रिसॉर्टचे चालक मनीष पाटील यांनी सांगितले.
छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मनस्ताप
उष्मा वाढत असल्यामुळे शीतपेय व आईस्क्रीमची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने आइस्क्रीमसह दुग्धजन्य व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. शीतपेयही खराब होत आहेत. सध्या उन्हाळी बेगमीची लगबग सुरू आहे. पिठाची गिरणी, मसाला गिरण्या, इस्त्री व लॉन्ड्री व्यावसायिकांनाही फटका बसतो आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
खंडित विजेमुळे पाणीपुरवठाही परिणाम होत आहे. अनेक इमारती, फार्महाऊस, दुमजली घरांमध्ये मोटारीने पाणी चढवले जाते. मात्र वीज नसल्याने पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असून कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
मोबाईल नेटवर्क गुल
बहुतांश मोबाईल टॉवरला इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सोय नसते. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्यास मोबाईल नेटवर्कही गायब होते. याचा फटका बँक, प्रशासनाचे सुविधा केंद्र, सेतू सेवा केंद्राला बसत असल्याचे महा ई-सेवा केंद्राचे संचालक दीपक कोकरे यांनी सांगितले. नेटवर्क सेवा बंद असल्यास सरकारी कामे रखडतात. कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक व विद्यार्थ्यांना खोळंबून राहावे लागते.
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे वीज महावितरण कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या पूर्ववत करणे, त्यावर आलेल्या फांद्यांची छाटणीची कामे सध्या सुरू आहेत. वादळी पावसाने कर्जतपासून पोलादपूरपर्यंत मोठे नुकसान झाले. मर्यादित मनुष्यबळामुळे हे काम जिकरीचे असले तरी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता, त्या भागातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास मॉन्सूनपूर्व कामे, देखभाल-दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील.
- आय.ए. मुलाणी, कार्यकारी अभियंता, एमएसईबी, पेण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.