विरारमधील नागरिकांना गढूळ पाण्याची "शिक्षा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

संतप्त महिलांची वसई-विरार पालिकेवर धडक; अधिकाऱ्यांना विचारला जाब 

वसई ः विरार पूर्वेकडील भागात काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने याची कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी थेट वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

विरार पूर्वेकडील फुलपाडा येथे अनेक चाळीत अनियमित पाणी येते. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत असतानाच आता जे पाणी मिळते तेही गढूळ येत आहे. नालासोपाऱ्यातदेखील असा प्रकार घडत असल्याचे समजते. विरार पूर्वेकडील आशादीप अपार्टमेंट, श्री महालक्ष्मी, ओम साई राम या गृहसंकुलांसह कुलस्वामिनी, जय मातादी, आदर्श, जागृती चाळ, ओम साई राम चाळीत महापालिकेचा पाणीपुरवठा होतो.

सामूहिक नळजोडणी असल्याने पाण्यासाठी अनेकदा रात्री रांगा लावाव्या लागतात. त्यातच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. पाणी स्वच्छ नसल्याने ते प्यायचे कसे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला असून काही नागरिक महागड्या बाटल्या विकत घेऊन ते पिण्यासाठी वापरत आहेत.

काही जणांच्या मते गढूळ पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या डोके वर काढत आहेत. त्यामुळे येथील 60 ते 70 महिलांनी थेट वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयावर धडक दिली. पाणीपुरवठा विभागात जाऊन गढूळ पाण्याबाबत जाब विचारत आम्हाला स्वच्छ पाणी द्यावे, अशी मागणी केली. या वेळी अंकिता गुरव, अस्मिता माळी, दुर्गा गायकवाड, प्रणिता जाधव, सुवर्णा जाधव, दर्शना गायकवाड यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. 

काही भागांत पाणी गढूळ येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाली आहे. याबाबत योग्य ती पाहणी केली जाईल. तसेच गढूळ पाणी येत असेल, तर त्याबाबाबत कार्यवाही करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. 
माधव जवादे, शहर अभियंता, वसई-विरार महापालिका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Virar "punish" for waste water near Mumbai