शास्त्रीय नृत्य, लॉकडाऊनच्या काळात तणावमुक्तीसाठी योग्य पर्याय ...

शास्त्रीय नृत्य, लॉकडाऊनच्या काळात तणावमुक्तीसाठी योग्य पर्याय ...

मुंबई - आज संपूर्ण जग कोरोना सारख्या भयंकर संकटाला सामोरं जातयं. सतत टिव्हीवरच्या कोरोना संबंधित बातम्या, व्हॉटसऍपवर येणारे मेसेजेस व व्हिडिओ बघून ‘कोरोना’ हा शब्द सतत आपल्या मनावर ‘हॅमर’ होतोय असं वाटायला लागलंय. कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासुन घरातली कामे, ऑफिसची कामे सारं काही घरात बसुन करण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. 
    
अशावेळी मरगळ येण साहजिकच आहे. हा मानसिक तणाव दूर करण्यासाठी, आनंदासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ‘नृत्य’ हे एक उत्तम साधन ठरू शकते. झुंबा, सालसा, हिप-पॉप, कण्टेम्पररी यांसारख्या आधुनिक आणि पाश्चात्य नृत्यशैली बरोबरच आपल्या भारतातील पुर्वांपार चालत आलेल्या प्राचीन शास्त्रीय नृत्यशैलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

खरं तर, नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. नृत + नाट्य मिळून ‘नृत्य’ हा शब्द तयार झाला आहे. नृत्य म्हणजे सजीवतेचे रूप. नृत्यातून मिळणारा आनंद शरीरात ऊर्जा निर्माण करतो. या नृत्याला जेव्हा आध्यात्मिक बैठक प्राप्त होते, नियमांचे बंधन येते, तेव्हा ते शास्त्रीय नृत्य बनते.  

शास्त्रीय नृत्याच्या नियमित अभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे होतात. शरीरातील रक्ताभिसरण नीट होते, सर्व व्याधी दूर राहतात, शरीर निरोगी राहते व बांधा सुडौल होतो. शास्त्रीय नृत्यातील काही मुद्रांचा वापर श्वसनावर व रक्तदाबावर नियंत्रण करण्याकरिता देखील होतो. तसेच नृत्यबोलांचे नियमित पठण केल्याने वाणी स्पष्ट होते, स्मरणशक्तीत वाढ होते, मनाची एकाग्रता वाढते. आपले नृत्य लोकांसमोर सादर करताना ते प्रभावशाली व्हावे म्हणून खूप विचार करावा लागतो. त्यामुळे बुद्धीचा कस वाढतो, गुणवत्तेत वाढ होते, रंगमंचावर जाण्याचा धीटपणा अंगी येतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे आपण अवघड अशी नृत्यशैली आत्मसात केल्याने एक वेगळाच मानसिक आनंद मिळतो. मनात चांगल्या भावना जागृत झाल्याने मनावर चांगले संस्कार रुजतात. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होऊन सृजनशिलता विकसित होते.

लॉकडाऊनमुळे बरेच नामवंत शास्त्रीय नर्तक ऑनलाईन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच सोशल नेटवर्किंग साईट्स वरून आपल्या नृत्याचे नवनवीन व्हीडिओज अपलोड करत आहेत. यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहते, व्यायाम होतो आणि मनोरंजनही होते. शिवाय ऑनलाईन नृत्य शिकवणीत विद्यार्थ्यांचे एक-दोन तास सहज निघून जातात. नृत्यसाधनेने दिवसभराचा तणाव एकदम हलका होतो. 
   
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास शास्त्रीय नृत्यामुळे मन आणि शरीराचा मिलाप होऊन एकाग्रता, स्थिरता लाभते.  मानसिक तणाव दूर होतो व आनंद मिळतो. हा आनंद लॉकडाउनच्या काळात नक्कीच फायदेशीर ठरू शकतो यात शंका नाही. त्यामुळे या काळात नृत्यसाधना अंखड सुरु ठेवा. 

classical dance is best way to become tensionfree during lockdown
 
                                                           

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com