ठाण्यात स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेची ऐशी तैशी   

दीपक शेलार
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

ठाण्यातील पाचपाखाडीतील धर्मवीर मार्गावरील रस्त्यावरील एका भिंतीवर स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला आहे. त्याच भिंतीलगत कचराच कचरा फेकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा जनजागृतीपेक्षा घरोघरी नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहे. 

ठाणे : स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे असे ब्रीद घेऊन ठाणे महापालिकेने "स्वच्छ सर्वेक्षण-2019' ही मोहीम सुरू केली असून यासाठी विविध उपक्रम महापालिकेद्वारे राबवले जात आहेत. असे असले, तरी नागरिकांकडून रस्त्यावरच इतस्ततः कचरा फेकला जात असल्याने पालिकेच्या या मोहिमेची "ऐशी तैशी' झाली आहे. ठाण्यातील पाचपाखाडीतील धर्मवीर मार्गावरील रस्त्यावरील एका भिंतीवर स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला आहे. त्याच भिंतीलगत कचराच कचरा फेकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा जनजागृतीपेक्षा घरोघरी नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहे. 

केंद्र सरकारने स्वच्छता मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी "स्वच्छता हीच सेवा' हा विषय घेऊन मोहीम सुरू केली. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदरचा उपक्रम प्राधान्याने राबवण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचनाही राज्य सरकारला दिल्या आहेत.

त्यानुसार गेली चार वर्षे ठाणे महापालिकेनेदेखील शहरात स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. कचरा कुंडी ही संकल्पनाच मोडीत काढण्यासाठी पालिकेने घरोघरी घंटागाडी फिरवण्याची योजना यशस्वीपणे राबवली आहे. याशिवाय ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून कचरा या घंटा गाडीतच टाकण्यात यावा यासाठी जनजागृती केली. 

नागरिकांनी कचरा इतस्ततः टाकू नये म्हणून शहरातील भिंतीवर तसेच जाहिरात फलकांवर स्वच्छता राखण्याचे संदेश दिले जात आहेत. तरीही पाचपाखाडी येथील धर्मवीर मार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर स्वच्छतेची जनजागृती करणाऱ्या भिंतीलगत कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. हा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यातदेखील बाधा येत असल्याने येथील कचऱ्याचे तातडीने उच्चाटन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

"ठाणे' फाईव्ह स्टार रेटिंग 
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी "स्वच्छ सर्वेक्षण 2019' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवले जातात. कचरामुक्त शहराचे मूल्यांकन होणार असून ठाणे शहराला "फाईव्ह स्टार रेटिंग' प्राप्त व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत प्रत्येक विभागाने आवश्‍यक ती कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी वेळोवेळी विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. तरीही कुणी शहर अस्वच्छ करीत असेल तर पाहणी करून कचऱ्याचे उच्चाटन करण्यात येईल. 
- शंकर पाटोळे, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clean survey drive in Thane