किनाऱ्यांवरील टेहळणी मनोरे निरुपयोगी; रायगडमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

प्रमोद जाधव
Thursday, 31 December 2020

रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या राज्यभरातून हजारो पर्यटक आले असताना मनोऱ्यांची ही अवस्था असल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या राज्यभरातून हजारो पर्यटक आले असताना मनोऱ्यांची ही अवस्था असल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनामुळे राज्यभरात आहे. त्यातही पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग, मुरूड, रेवदंडा, काशिद, हरेश्वर, श्रीवर्धन आदी प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याद्वारे समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेऊन बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याबरोबरच घातपाताची घटना रोखण्याचा उद्देश आहे. 

मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील 20 समुद्रकिनारी मनोरे बांधले आहेत. याच प्रकल्पानुसार जीवरक्षक तैनात करणे, त्यांना साधने पुरवणे आदींसाठी सुमारे 78 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायत, पालिकांकडे देण्यात आली; परंतु रेवदंडा, काशिद, अशा वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरील मनोऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीर्ण झालेल्या मनोऱ्यांमुळे जीव रक्षकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूरवरील संशयित हालचाली तसेच पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्यास अडथळे निर्माण होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल झाले आहेत; मात्र दुरवस्था झालेल्या मनोऱ्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव रक्षकांसह टेहळणी मनोरे आणि सुरक्षेचे साहित्य ग्रामपंचायत व पालिकांकडे वर्ग केले आहेत. देखभाल दुरुस्तीचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. किनाऱ्यावरील दुरवस्था झालेले मनोरे दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला आपत्ती विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. 
- सागर पाठक,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड 

Coastal watchtowers useless In Raigad the question of safety of tourists is on the agenda

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coastal watchtowers useless In Raigad the question of safety of tourists is on the agenda