एसटीला आर्थिक संकटातून बाहेर कसं काढावं ? अनिल परब यांनी सुचवला पर्याय

प्रशांत कांबळे
Thursday, 3 December 2020

सध्या शासनाच्या मंजूरीनंतर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतुक सुरू आहे.

मुंबई, ता. 3 : कोविडच्या संकटांतून बाहेर पडताना, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल परब यांनी व्यक्त केले. बुधवारी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

कोवीड - 19 च्या पुर्वी दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एसटीला कोविडच्या काळात तब्बल पाच महिने मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात सेवा बंद ठेवावी लागली. या काळात दररोज सरासरी २२ कोटी रुपये या प्रमाणे तब्बल सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या महसूल गमवावा लागला. दुर्दैवाने त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या आर्थिक स्थितीवर झाला आणि दरमहा 50 कोटी रुपयांचा तोटा सध्या 350 कोटी रुपये पर्यंत पोहोचला.

महत्त्वाची बातमीसुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार का?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

कोविडच्या काळामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार लाखो मजुरांची  वाहतूक, अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, पोलिस, शासकीय कर्मचारी, सफाई कामगार अशा कोविड योध्दयांचे सारथ्य, ऊस तोडणी कामगार, परराज्यात असणारे विद्यार्थी, त्यांची वाहतूक, तसेच अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक करण्यासाठी एसटीने शर्थीचे प्रयत्न केले आहेत. 

सध्या शासनाच्या मंजूरीनंतर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतुक सुरू आहे. एसटीचे दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करुन, ना नफा ना तोटा पातळीपर्यंत महामंडळाचे आर्थिक उत्पन्न येण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी केवळ प्रवासी तिकिटाच्या महसुलावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे स्रोत विकसित करणे तसेच महामंडळाच्या सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने दैनंदिन व्यवस्थापनामध्ये काटकसर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने पुढील कृतीशील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश मंत्री, परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र प्रभारी मुंबईत; भारतीय जनता पक्षाच्या जोरदार संघटनात्मक हालचाली

भविष्यात उत्पादन वाढीसाठी परब यांच्या सूचना

  • एसटीचे भविष्यात सुमारे 3 हजार मालवाहू वाहने तयार करून व्यवसायिक स्पर्धेला सक्षमपणे तोंड देत मालवाहतूक विस्तारित करावी.
  • एसटीच्या टायर पुनर:स्थिरीकरण प्रकल्पाचा व्यवसायिक वापर करण्याच्या दृष्टीने विस्तार करण्यात यावा.
  • मार्च 2021 पर्यंत  किमान 5 पेट्रोल पंप इंडियन ऑइल कार्पोरेशन च्या सहकार्यातून सर्व सामान्य जनतेच्या वापरासाठी प्रत्यक्ष संचालित करावेत.
  • एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगार व विभागांना उत्पादित किलोमीटरवर आधारित उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्टे देण्यात यावीत. 
  • उत्पन्नाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आगार, विभागांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात यावीत .
  • निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
  • संचित तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या विनावापर पडून असलेल्या जमीनीवर उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध व्यवहारिक उपाययोजनांची पडताळणी करावी
  • इंधनावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने, वर्ष 2023 पर्यंत एसटीच्या सुमारे 3 हजार बसेस लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनावर रूपांतरित करण्यात याव्यात.
  • भविष्यात एसटी महामंडळमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती बाबत पात्र कर्मचाऱ्यांची मते आजमावून घ्यावीत.
  • दैनंदिन प्रवासी तिकीट विक्रीतून सध्या येणारे  12 कोटी रुपये उत्पन्न दुप्पट म्हणजे, 24 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचे दृष्टीने प्रवासी वाहतूक सेवेमध्ये गुणात्मक बदल करावा. 

collective efferts are needed to take ST out of economic crisis anil parab


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collective efferts are needed to take ST out of economic crisis anil parab