महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी; शिवसेना आमदाराचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तेजस वाघमारे
Monday, 21 September 2020

महाविद्यालयीन प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना  अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील 100 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई व जवळच्या उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना  अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोधी नेतेपदी रवीराजा कायम, भाजपची याचिका नामंजूर

अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षा संबंधीत अनेक कामे प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात येऊन करावी लागणार आहेत. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रसार  तसेच मुख्यतः बेस्ट बसेस व इतर सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. हे पाहता महाविद्यालयीन शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास देणे गरजेचे आहे. आजमितीला अनेक शिक्षक ठाणे - पनवेल, नवी मुंबई, वसई विरार पालघर येथे राहत असल्यामुळे या शिक्षकांना बसने प्रवास करणे त्रासदायक ठरणार आहे. व त्यासाठीच महाविद्यालयीन शिक्षकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याची गरज आहे, असे कायंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College staff should be allowed to travel by train Shiv Sena MLAs demand to CM