लॉकडाऊनमध्ये दिलासा! ठाणेकरांना मिळणार थेट भाजीपाला...

राजेश मोरे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत दैनंदिन भाजीपाला घेण्यासाठी नागरिक दररोज बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये व बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना थेट भाजीपाला त्यांच्या इमारतीपर्यंत उपलब्ध करून दिला जाणार आहे. ठाण्यातील 'मी मराठी प्रतिष्ठान' व 'क्रक्स रिस्क' मॅनेजमेंट प्रा. लि यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

ठाणे : सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत दैनंदिन भाजीपाला घेण्यासाठी नागरिक दररोज बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये व बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना थेट भाजीपाला त्यांच्या इमारतीपर्यंत उपलब्ध करून दिला जाणार आहे. ठाण्यातील 'मी मराठी प्रतिष्ठान' व 'क्रक्स रिस्क' मॅनेजमेंट प्रा. लि यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

सावधान...! भामट्यांकडून फसवणुकीची नवी स्टाईल

ठाणेकरांना शेतातील भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर दालनात या शेतकरी ते ग्राहक असा थेट भाजीपाला या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आदी ‍उपस्थित होते. या उपक्रमासाठी मी मराठी प्रतिष्ठान व क्रक्स रिस्क मॅनेजमेंटचे डॉ. राजेंद्र पाटील व विरेंद्र पाल यांनी पुढाकार घेतला आहे. 

उपक्रमातून प्रत्येक ऑर्डरमागे 10 रुपयांचा निधी हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला जाणार आहे. यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही. त्यामुळे यातून सामाजिक सेवा देखील होणार असून ग्राहकांना सर्व तऱ्हेची काळजी घेऊन उच्च प्रतीचा भाजीपाला व फळे मिळणार आहेत. या उपक्रमात जे काम करणार आहेत, त्यांच्या स्वच्छतेची काळजी तसेच त्यांना मास्क, हॅण्डग्लोव्हज आदी सुरक्षेची उपकरणे उपलबध करून दिली जाणार आहेत. 

वाचा सविस्तर : कोरोनाबाबत सरकारच्या धोरणांची थट्टा नको

भाजीपाला उपक्रमात प्रत्येक इमारतीतून 10 पेक्षा अधिक मागणी असल्यास ते पोहचविणे शक्य होईल व ऑर्डर देताना 'सोशल डिस्टंसिंग' देखील पाळले जाईल असेही डॉ. राजेंद्र पाटील यांनी नमूद केले. अधिक माहितीसाठी डॉ. राजेंद्र पाटील 9420787197 व विरेंद्र पाल 9820399044 यांना संपर्क साधावा. 

...असा मागवा भाजीपाला 
   www.mmdcare.in या संकेतस्थळावर किंवा 9987736103 या व्हॉट्सॲप क्रमांकावर नागरिकांनी आपल्याला हव्या असलेला भाजीपाला व फळे यांची मागणी नोंदविल्यानंतर पैसेही ऑनलाईन भरता येणार आहेत. किंवा ऑर्डर आल्यानंतर पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी मागणी करताना कमीत कमी 300 रुपयापासून अधिकची मागणी नोंदवावी. मागणी नोंदवल्यापासून पुढच्या 48 तासात त्या ग्राहकाला भाजीपाला व फळे उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ठाणेकरांनी घरी बसूनच आपल्याला लागणारा भाजीपाला व फळे मागवावीत. त्यामुळे बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. या अभिनव उपक्रमाचा नागरिकांनी आवश्य लाभ घ्यावा.
- नरेश म्हस्के 
महापौर, ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfort in lock down! Thanekar will get vegetables at home ...