पहिल्याच पावसातच मुंबई खड्ड्यात, पहिल्याच दिवशी खड्ड्यांबाबत आल्यात इतक्या तक्रारी..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

मुंबईत कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र या आधी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीने मुंबईचे रस्ते खड्डेमय झाले.

मुंबई : मुंबईत कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र या आधी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीने मुंबईचे रस्ते खड्डेमय झाले. आजच्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरात खड्डे पडल्याच्या तब्बल ६० तक्रारी रस्ते विभागाकडे  प्राप्त झाल्या असून तक्रार मिळताच खड्डे बुजवण्यात आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.

आधीच कोरोनाचे संकट त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून ३१ मे पर्यंत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. परंतु पावसाचे आगमन झाले तरी मुंबईतील ठिकठिकाणच्या भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. कुर्ला, प्रतिक्षानगर, सायन, अंधेरी, घाटकोपर, मालाड, गोरेगाव, आदी भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. पहिल्या पावसानंतरच खड्ड्यांच्या तक्रारी आल्याने रस्त्यांच्या कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, आपत्कालीन नियंत्रण कक्षासह रस्ते विभागाकडे खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींची दखल घेत संबंधित विभागातील तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे दराडे यांनी सांगितले.

BIG NEWS - ...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

आज पावसाला सुरुवात झाली असून मुंबई शहर व उपनगरातून खड्ड्यांच्या तक्रारी येताच तक्रारीची दखल घेत खड्डे बुजवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  मुंबईचे रस्ते चकाचक रहावे, यासाठी रस्त्यांची डागडुजी, नवीन रस्ते बनवणे यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये मुंबई महापालिका खर्च करते. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचे काम रस्ते विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. ३१ मे पूर्वी मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र पावसाळा सुरु होताच मुंबईच्या रस्त्यांची चाळण झालेली पहावयास मिळते, असा आरोप पालिकेतील विरोधी पक्षाने केला आहे.

complaints of sixty potholes registered in the first rain of mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaints of sixty potholes registered in the first rain of mumbai