बेस्ट बसगाड्यांच्या संपूर्ण खासगीकरणावर शिक्‍कामोर्तब; कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेकडून प्रस्ताव मंजूर

समीर सुर्वे
Wednesday, 20 January 2021

स्वत:च्या बसगाड्या चालवणे परवडत नसल्याने भाड्याने बसगाड्या घेऊन त्या चालविण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे

मुंबई  : बेस्टने मंगळवारी बसगाड्यांच्या संपूर्ण खासगीकरणावर शिक्कामोर्तब केले. 400 भाड्याच्या बसगाड्यांमध्ये आता कंत्राटदार चालकासह वाहकही पुरविणार आहे. या प्रस्तावाला मंगळवारी (ता. 19) ला बेस्ट समितीने मंजुरी दिली. बेस्ट उपक्रम पुढील दहा वर्षांत कंत्राटदाराला एक हजार 942 कोटी रुपये मोजणार आहे. 

स्वत:च्या बसगाड्या चालवणे परवडत नसल्याने भाड्याने बसगाड्या घेऊन त्या चालविण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. अशा 900 मिनी वातानुकूलित गाड्या सध्या रस्त्यावर धावत आहेत. या बसचे चालक हे कंत्राटदारामार्फत पुरविण्यात आले आहेत. मात्र पैशाचा व्यवहार करणारा वाहक बेस्टचा होता. बेस्टचे वाहक ठराविक थांब्यांवर थांबून प्रवाशांना तिकीट देत होते; मात्र आता नव्याने भाड्याने घेण्यात येणाऱ्या बसगाड्यांमध्ये कंत्राटदार वाहकही पुरविणार आहे. किलोमीटरच्या हिशेबाने पैसे कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेने कॉंग्रेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. भाजपचे सुनील गणाचार्य यांनी बेस्टच्या वाहतूक विभागाचे संपूर्णपणे खासगीकरण केले जात असल्याचा आरोप केला. तसेच प्रकाश गंगाधरे यांनी हा निर्णय कामगारविरोधी असल्याचा आरोप केला; तर सध्या बेस्टला बसगाड्यांची गरज आहे. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी दुसरा पर्याय सध्या दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा लागल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. 

the complete privatization of BEST buses ShivSena approves proposal with the help of Congress

--------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the complete privatization of BEST buses ShivSena approves proposal with the help of Congress