डॉक्टरांच्या संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद; बेमुदत संपाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

राज्यभरातही दीड लाख डॉक्‍टर आणि देशभरातील नऊ लाख डॉक्‍टर्सपैकी ऐंशी टक्के डॉक्‍टरांनी सहभाग घेतल्याची माहिती डॉ. पाचणेकर यांनी दिली.

मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज (बुधवार) देशभरात भारतीय वैद्यकीय परिषद (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतही दवाखाने बंद दिसून आले असले तरीही एकदिवसीय संपाने फारसा परिणाम जाणवून आला नाही. 

देशभरात आयएमएचे केवळ ऐंशी टक्के सदस्यच उपोषणात सहभागी झाले. मात्र, सरकारला आमचे म्हणणे मान्य करून घेण्यासाठी भविष्यात बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा आयएमचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली. 

या विधेयकामुळे परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न अधिका-यांना औषधे देण्याचा परवाना मिळत असल्याने आयएमने या विरोधकाला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. मात्र सोमवारी विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर डॉक्‍टरांनी दिल्लीत मोठ्या संख्येने निदर्शने केली. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण सेवा, दवाखाने गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. यात मुंबईतील एंशी हजार डॉक्‍टर्सपैकी एंशी टक्के डॉक्‍टरांनी सहभाग घेतला.

सरकारी व पालिका रुग्णालयांतील दररोजच्या बाह्यरुग्ण विभागाची संख्या नेहमीप्रमाणेच होती. त्यामुळे एक दिवसाच्या खासगी वैद्यकीय सेवेने रुग्णसेवा कोलमडली नसल्याचे चित्र दिसून आले. बाह्यरुग्णसेवा बंद असली तरीही आपत्कालीन सेवेत सहभागी राहणार असल्याचे आयएमएने अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आपत्कालीन सेवेत डॉक्‍टर्स सहभागी होते, असा दावा आयएमएकडून करण्यात आला. 

राज्यभरातही दीड लाख डॉक्‍टर आणि देशभरातील नऊ लाख डॉक्‍टर्सपैकी ऐंशी टक्के डॉक्‍टरांनी सहभाग घेतल्याची माहिती डॉ. पाचणेकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Composite response in the state to doctors strike Warning for unstoppable strike