सानपाडा रेल्वेस्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आहेत.

नवी मुंबई : गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आहेत. विनापरवाना थाटलेले रिक्षा स्टॅण्ड, दुकान व्यावसायिकांनी गिळकृंत केलेले पदपथ; त्यातच फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, यामुळे स्थानक परिसरात गर्दी वाढत आहे.

सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडे सानपाडा गाव, तुर्भे एपीएमसी मार्केट; त्याचबरोबर वाशीकडे जाणारा रस्ता या ठिकाणावरून रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने रोज ये-जा करतात. या रेल्वेस्थानकाच्या बाहेर परिवहनचा डेपोदेखील आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाढते; तर सानपाडा रेल्वेस्थानकाकडे येण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने त्यात प्रवाशांची भर अधिक पडते. या ठिकाणी नियोजित रिक्षा स्टॅण्ड असतानादेखील बिकानेर स्वीट कॉर्नरनजीक वळणावर; त्याचबरोबर रेल्वेस्थानकाच्या सुलभ शौचालयालगत विनापरवाना रिक्षा स्टॅण्डने बस्तान मांडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

याशिवाय रिक्षाचालक मनमानीपणे रिक्षा उभी करत असल्याने त्याचा त्रास विशेषत: शालेय विद्यार्थी आणि महिलांना सोसावा लागत आहे. सकाळच्या वेळेला रेल्वेस्थानकाकडे पार्किंगसाठी देखील अनेक वाहने येतात. त्याचबरोबर दुकान व्यावसायिकांच्या गाड्या उभ्या असतात. त्यातच बिकानेर कॉर्नरचा संपूर्ण पदपथ आणि रस्ता दुकानधारकांनी गिळंकृत केल्याने पदपथावरून चालणेदेखील कठीण होते. या ठिकाणचा विनापरवाना रिक्षा स्टॅण्ड हटविण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली होती; मात्र याकडे प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले.

स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षांमुळे रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या रिक्षांमुळे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- समीर कर्वे, प्रवासी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conflict of chaotic rickshaws at Sanpada Railway Station