सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या प्रकृतीसाठी काँग्रेस नेत्याचा 33 किमी पायी प्रवास.

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठाण्यातल्या काँग्रेस नेत्यानं मुंबईतल्या सिद्धिविनायकाला साकडं घातलं आहे.

. मुंबई: कोरोना व्हायरसनं राज्यभर थैमान घातलं आहे. त्यासोबतच मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. या व्हायरसच्या विळख्यात आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, पोलिस यांचाही समावेश झाला आहे. या कोरोना व्हायरसपासून राज्यातल्या काही नेतेही आपला बचाव करु शकले नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या दोन मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 

त्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठाण्यातल्या काँग्रेस नेत्यानं मुंबईतल्या सिद्धिविनायकाला साकडं घातलं आहे. विशेष म्हणजे हे साकडं घालण्यासाठी या नेत्यानं 33 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. हे 33 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या नेत्याला साडे पाच तास लागलेत. 

Inside Story : आपल्या शिंकेतून एका सेकंदात इतक्या दूरवर जातो कोरोनाचा विषाणू

ठाणे शहरातील काँग्रेसचे प्रवक्ते मेहेर चौपाने यांनी आपल्या नेत्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं आहे. बुधवारी ते आपल्या घरातून पायी सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेनं दर्शनासाठी निघाले. त्यानंतर ठाणे ते सिद्धिविनायक असं 33 किलोमीटर अंतर त्यांनी साडेपाच तासांत पूर्ण केलं. लॉकडाऊन असल्यानं मुंबईतली सर्वच मंदिरं बंद आहेत. त्यामुळे चौपाने यांनी मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेऊन पूजा केली आणि आपल्या नेत्याची तब्येत लवकरात लवकर ठिक व्हावी अशी प्रार्थना केली. 

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात:

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.  आव्हाडांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आव्हाड आता कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आव्हाड सध्या आपल्या घरी विश्रांती घेताहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करुन दिली होती.

काही दिवसांपूर्वी आव्हाड हे मुंबईतल्या काही कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते.  त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर आव्हाडांना अचानक ताप आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकीही एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. ठाणे नगरपालिकेचे पीआरओ संदीप मालवी यांनी सांगितल्यानंतर, आव्हाडांचे स्वॅब सॅँपल चाचणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट आल्यानंतर आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. 

मोठी बातमी! रुग्णांची बेडसाठी होणारी फरफट अखेर थांबणार;पालिका 'या' पद्धतीनं ठेवणार बेडची माहिती..

पहिल्यांदा त्यांना ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

congress leader walked 33 kilometres for congress ministers health read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader walked 33 kilometres for congress ministers health read full story