भिवंडीत काँग्रेसची सरशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे सभापती व उपसभापती निवडून आले आहेत. या निवडणुकीत कोणार्क व भाजपसह अन्य अपक्ष नगरसेवक अनुपस्थित होते. त्याचा कॉंग्रेस पक्षाला फायदा झाला. 

भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे सभापती व उपसभापती निवडून आले आहेत. या निवडणुकीत कोणार्क व भाजपसह अन्य अपक्ष नगरसेवक अनुपस्थित होते. त्याचा कॉंग्रेस पक्षाला फायदा झाला. 

आज सकाळी 11:30 वाजता महापालिकेच्या सभागृहात विषय समिती निवडणूक हात वर करून पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर , ठाणे जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे, नगरसचिव अनिल प्रधान उपस्थित होते. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी घेण्यात येणारी निवडणूक कोकण आयुक्तांच्या आदेशाने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी रद्द केली आहे. त्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थायी समिती सभापती निवडणूक प्रक्रियेबाबत कॉंग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडीला स्थगिती देत नव्याने अर्ज सादर करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. 

सभापती निवडीचा मार्ग सुकर 
महापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार झटका बसल्याने या निवडणुकीत पुन्हा मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी काळजी घेतली होती. त्यामुळे आज पार पडलेल्या विषय समिती निवडणुकीत कॉंग्रेसचा वरचष्मा दिसून आला. त्यातच या निवडणुकीवेळी कोणार्क विकास आघाडी आणि भाजपचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने सभापती निवडीचा मार्ग सुकर झाला. 

समिती                         सभापती               उपसभापती 
बांधकाम                      नाजेमा अन्सारी     जुबेर फारूक
शिक्षण                        वैशाली म्हात्रे          फरजाना रंगरेज
क्रीडा                            परवेज मोमीन       नाजेमा अन्सारी
आरोग्य व स्वच्छता       मुख्तार खान          साजिद अन्सारी
गलिच्छ वस्ती सुधार      मनीषा दांडेकर        फिरोजा शेख
महिला व बालकल्याण    नादिया खान          सुग्राबी खान 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Mustard in Bhiwandi Municipality Subjects Committees Election