आगामी BMC निवडणुकीसाठी कॉंग्रेसने कसली कंबर; मनहास यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

समीर सुर्वे
Saturday, 9 January 2021

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. 227 प्रभागांमध्ये तयारीसाठी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची मदत घेतली जाणार आहे.

मुंबई  : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. 227 प्रभागांमध्ये तयारीसाठी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची मदत घेतली जाणार आहे. याविषयी समन्वय ठेवण्याची जबाबदारी समन्वय समितीचे प्रमुख डॉ. अमरजितसिंह मनहास यांच्यावर सोपवली आहे. मनहास हे मुंबई कॉंग्रेस आणि महापालिकेतील कॉंग्रेसमध्येही समन्वय ठेवणार आहेत. 
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कॉंग्रेस महाविकास आघाडीत न लढवता स्वतंत्र लढवणार असल्याचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह मुंबईतील सर्वच नेत्यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते. पहिल्यांदाच कॉंग्रेसचे एवढ्या कमी प्रमाणात नगरसेवक निवडून आले असून, कॉंग्रेसच्या अनेक पारंपरिक प्रभागात भाजपने मुसंडी मारली आहे. त्यासाठी आता कॉंग्रेसची उजवी बाजू आणि भाजपच्या अपयशाचा हिशेबच तयार करण्यात येणार आहे. ही जबाबदारी जाहीरनामा समितीचे प्रमुख माजी राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक प्रभागावर लक्ष

डॉ. मनहास यांच्यावर समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. 227 प्रभागांत निवडणूक लढण्यासाठी आतापासून तयारी करण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या समन्वयातून कामे करून घेण्याची जबाबदारी डॉ. मनहास यांच्यावर आहे. त्याचबरोबर पालिका आणि मुंबई कॉंग्रेस यांच्यात समन्वय ठेवणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार, महापालिका यांच्यामार्फत समन्वय राखणे अशी जबाबदारीही त्यांच्यावर आहे. प्रत्येक प्रभागातील राजकीय, सामाजिक आणि नागरी समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्याची जाबाबदारी शेट्टी यांच्यावर आहे. 

Congress ready for upcoming BMC elections Responsibility for coordination on dr Manhas

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress ready for upcoming BMC elections Responsibility for coordination on dr Manhas