भिवंडीत कॉंग्रेस फुटली, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

 भिवंडी शहर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या; तर उपमहापौरपदावर कोणार्क पुरस्कृत कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस-शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

 

भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या; तर उपमहापौरपदावर कोणार्क पुरस्कृत कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस-शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

 भिवंडी पालिकेत महापौर व उपमहापौरपदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ही निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी कॉंग्रेसतर्फे रिषिका राका व भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय (एकतावादी), समाजवादी पक्ष व भाजप व फुटीरतावादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या; तर शिवसेना कॉंग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. 

विशेष म्हणजे महापालिकेत कॉंग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक भाजप कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने कॉंग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना 41 मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. 

खराब रस्ते व वाहतूक कोंडीचा जिल्हाधिकाऱ्यांना फटका 
भिवंडी महानगरपालिकेत महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक गुरुवारी दुपारी 12 वाजता मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, मात्र भिवंडीतील खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी उशिरा पोहचल्याने ही निवडणूक जवळपास 20 मिनिटे उशिरा सुरू झाली. 
 
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कॉंग्रेस पक्षाचे व्हीप वाटप 
या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अन्सारी यांनी सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कॉंग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीने पक्षाचे व्हीप वाटप सुरू केले. त्यावर कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले. विशेष म्हणजे कॉंग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला कॉंग्रेस उमेदवार रिषिक राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असताना आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा, अशी जाहिरात खुद्द कॉंग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे दोन दोन व्हीप जाहीर केल्याने महापौर व उपमहापौर निवडणुकीत होणाऱ्या आर्थिक घोडेबाजाराची चापलुसीदेखील चव्हाट्यावर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress split in the fray, Karnak's genius Patil as mayor