मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा! पावतीच्या आधारे विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश

तेजस वाघमारे
Wednesday, 20 January 2021

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस, एनसीएल आणि सीव्हीसी प्रमाणपत्र सादर न करता अर्जाची पावती सादर केली आहे.

मुंबई  : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस, एनसीएल आणि सीव्हीसी प्रमाणपत्र सादर न करता अर्जाची पावती सादर केली आहे. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पावतीच्या आधारे विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. विशिष्ट कालावधीत कागदपत्रे सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित केला जाईल, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी (ता. 20) रात्री उशिरा जाहीर केले आहे. 

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस, एनसीएल आणि जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. यानंतरही अनेक जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अद्याप मिळू शकलेले नाही. या प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत पावती जोडली आहे, अशा विद्यार्थ्यांना त्याआधारे संबंधित प्रवर्गातून जागावाटप करण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अशा उमेदवारांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून ज्या प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल, त्या त्या प्रवर्गातून संस्थेत प्रवेश देण्यात येईल; मात्र हा प्रवेश तात्पुरता देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया संपण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी संबंधित उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील; अन्यथा प्रवेश रद्द केले जातील, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे. यामुळे हे प्रमाणपत्र प्राप्त नसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 
Consolation to backward class students Temporary admission to students on the basis of receipt

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to backward class students Temporary admission to students on the basis of receipt