रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी

कृष्ण जोशी
Tuesday, 1 December 2020

कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत

मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत. 

हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे. 
प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.comdgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

हेही वाचा - जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले. 

Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers