मुंबई - मुघल बादशाह औरंगजेबाची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू असिम आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्याचीदेखील बंदी घालण्यात आली आहे.
अबू आझमी यांनी विधानभवन आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना ‘औरंगजेब किती चांगला शासक होता’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. आझमींच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात अली होती.
अबू आझमी यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात गोंधळ घालत कामकाज बंद पाडले होते. आजही सत्ताधारी पक्षाचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते. विधानसभेत यावरून जोरदार गदारोळ करत घोषणाबाजी देखील करण्यात आली.
‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता’ हे आझमींचे वक्तव्य अतिशय गंभीर असून त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे; तसेच त्यांना या कालावधीत विधानभवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला.
भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जुने दाखले देत केवळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन न करता त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी केली. हवे तर यासाठी आमदारांची समिती नेमून समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
आघाडी सरकारच्या काळात भाजपचे १२ सदस्य निलंबित झाले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. निलंबन एका अधिवेशनापुरतेच करता येऊ शकते, असा निर्णय न्यायालयाने दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद करत सभागृहाच्या मर्यादा स्पष्ट केल्या.
आमदार अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा ठराव चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याला मतविभाजनाद्वारे मंजुरी दिली. दरम्यानच्या काळात सभागृहात झालेल्या या गोंधळामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले.
औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही. तो नालायकच होता. मुस्लिम लोकांमध्येही कोणी मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाहीत.
- विजय वडेटटीवार, काँग्रेस गटनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.