नवी मुंबईत कोरोनाबाधितांचे अर्धशतक; एकाच कुटूंबातील 6 जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 13 April 2020

  • नवी मुंबईत कोरोनाचे नवीन 11 रुग्ण
  • एकाच कुटूंबातील 6 जणांना लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या 50 वर

नवी मुंबई : शहरात एकाच दिवशी कोरोनाचे 11 रुग्ण सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बेलापूर गावात एकाच कुटुंबातील तब्बल 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे आता नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 50 वर पोहचली आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी बेलापूर गावातील एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्याच कुटुंबातील इतर सदस्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल सोमवारी (ता.13) मिळाल्यानंतर त्यात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सहा जणांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी वाशी सेक्टर 9 मधील एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. याच कुटुंबातील वृद्धाची सून आणि मुलगा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नेरुळ सेक्टर 28 मध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती काही दिवसांपूर्वी राजस्थानहुन नवी मुंबईत परतली आहे. कोपरखैरणे सेक्टर 2 मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी नेरुळ सेक्टर 23 मध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आज दिवसभरात सापडलेल्या 11 रुग्णांमुळे नवी मुंबईत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 50 झाली आहे.

CORONA CASESE RISE IN NAVI MUMBAI


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CORONA CASESE RISE IN NAVI MUMBAI