घर खर्चासाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण 

निलेश मोरे
रविवार, 5 एप्रिल 2020

 

सुरक्षारक्षकांनाही फटका; लाॅकडाऊन वाढवल्यास उपासमारीची वेळ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर देश १४ एप्रिल पर्यंत लॅाक डाऊन करण्यात आला आहे. मात्र या संचारबंदीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत असून त्यांच्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाजीनगर येथे राहणारे सागर पवार यांच्या कुटूंबावर देखिल अशीच उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तसेच घरखर्च चालविण्यासाठी पवार यांना आपल्या पत्नीचे दागीने गहाण ठेवावे लागले आहेत.

सागर पवार (रा. शिवाजी नगर, म्हाडा कॅालनी)  सुरक्षारक्षकाची नोकरी करतात, त्यांचावर आई, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, घरखर्च, पाणी, वीज बिल भागवण्यात पवार यांचा सगळा पगार खर्च होतो. मागील वर्षी कामावर ये-जा करण्यासाठी पवार यांनी एका फायनांन्स कंपनीकडून ९५ हजारांचे कर्ज घेऊन नविन दुचाकी खरेदी केली. त्याचा ४५०० रुपयांचा दरमहिना हप्ता पवार यांना भरावा लागतो. २० मार्च पासून काम बंद असल्यामुळे पवार यांनी पत्नीचे सोन्याचे मंगळसुत्र गहाण ठेऊन १० हजारांचे कर्ज काढले आहे. दरम्यान घरखर्चासाठी सर्व पसै खर्च झाले असून ३ एप्रिल रोजी फायनांन्स कंपनीकडून एप्रिल आणि मे महिन्यात जादा व्याज भरावे लागणार असल्याचा मेसेज आल्यामुळे पवार यांचे संपुर्ण कुटुंबच चिंतेत आहे.

२१ दिवस लॉकडाऊन असल्याने घरा बाहेर पडून काम करता येत नाही. कर्ज, गहाण ठेवलेले दागिने कसे सोडवायचे, त्यातच पुढील काळात घर कसे चालवायचे याची चिंता लगली असून कोणी उसने पैसे दिखिल देण्यास तयार नसल्याने कुटबं चालवायचे कसे अशी भीती मनात निर्माण झाल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली.
 
सुरक्षारक्षकाच्या नोकरीमध्ये महिना १४ हजार पगार मिळतो. कर्जाचा हप्ता, घरखर्चामध्ये सगळा पगार खर्च होतो. लॉकडाऊन होणार याची कल्पना कधी केली नव्हती, गेले १२ दिवस आम्ही अत्ंयत उपासमारीत दिवस काढत आहोत. कर्जाचा हप्ता कसा भरायचा याची चिंता सर्व कुटुंबला लागली आहे.
- सागर पवार, सुरक्षारक्षक.

 पतीच्या निधनानंतर मी गेली ३० वर्ष सामाजिक चळवळीत काम केले. महिलांच्या न्याय हक्कासाठी उभी राहिली, मात्र आज माझं कुटुंब हतबल होताना पाहताना दुःख होतंय. कुटुंबाच्या चिंतेमुळे जेवणाचा घास ही पोटात जात नाही.
- आशा पवार, सागर पवार यांची आई.

महत्त्वाची बातमी...
मुंबईत संकटकाळात ग्राहकांची लुटमार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect : security guard mortgaged wife's jwellery to run the house