ठाण्यातील कोरोनाबाधितांमध्ये 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक...

राहुल क्षीरसागर
गुरुवार, 30 एप्रिल 2020

  • 26 ते 40 वयोगटातील नागरीकांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक!कोरोनाबाधितांमध्ये महिलांपेक्षा पुरुष जास्त;
  • जिल्ह्यातील एकूण संख्या 800 पार 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोन या आजाराने हळूहळू आपले रौद्ररूपधारण करीत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कोरोना बाधितांची आकडेवारी आता 800 च्या वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे यात 26 ते 40 वयोगटातील सर्वाधिक म्हणजे 341 रूग्ण असून बाधित झालेल्यांमध्ये 539 इतकी पुरुष मंडळींची संख्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई या प्रमुख चार महापालिकांमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून विविध उपाययोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचार बंदी लागू केली. मुख्य भाजी बाजार पेठांमध्ये गर्दी होवू नये याकरिता, भाजी मार्केटचे विविध भागात करण्यात आलेले विभाजन, अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांशिवायइतर अस्थापना बंद ठेवणे आदी महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. 
     ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधीतांचा आकडा 867 इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 539 इतकी पुरुष बाधितांची संख्या असून 328 इतकी महिला बाधितांची संख्या आहे. तर, या आजारातून आतापर्यंत 177 जण उपचारांती पूर्णतः बरे झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना या आजाराने 26 ते 40 वयोगटातील सर्वाधिक 341 जणांना आपल्या विळख्यात ओढले आहे. तर, त्याखालोखाल 1 ते 25 वयोगटातील 190 जणांना देखील या आजाराचे शिकार झाले आहेत. तर, आतापर्यंत वयाची साठी पार केलेल्या 80 जणांना या आजाराची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडील आकडेवारी वरून दिसून येत आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

वयोगट    बाधितांची संख्या
1 ते 25     190 
26 ते 40       341
41 ते 50         149
51 ते 60.     160
60 च्या पुढे        80   

    शहरातील रस्त्यांवर नियमाचे पालन न करता नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे. त्यात कोरोनाबाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत घरातच राहावे व कोरोनापासून आपला व आपल्या परिसराचा बचाव करावा. 
 - डॉ. कैलास पवार,

जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona is higher in citizens aged 26 to 40 years in thane