गणरायाच्या मखर उद्योगालाही कोरोनाचा जबर फटका; सरकारी धोरण ठरेना...

गणरायाच्या मखर उद्योगालाही कोरोनाचा जबर फटका; सरकारी धोरण ठरेना...

ठाणे - कोरोना संक्रमणामुळे यंदा प्रथमच गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही राज्य सरकारने जारी केल्या आहेत. त्यामुळे गणेशमुर्ती विक्री करणाऱ्यांबरोबरच मखर व्यवसायिकही अडचणीत आले आहेत. गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असतानाही अद्याप मखर विक्री कशी करावी याविषयी त्यांचा निर्णय झालेला नाही. येत्या आठवड्याभरात परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे व्यवसायिकांचे म्हणने आहे. परंतू यंदा मखर विक्रीची दुकाने, प्रदर्शन भरणे शक्य नाही, त्यातच व्यवसायही किती होईल याविषयीची चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

22 ऑगस्टपासून गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी या उत्सवाची लगबग गणपती कारखाने आणि मखर व्यावसायिकांकडे तीन चार महिने आधीपासूनच सुरु होते. दिड महिना आधीपासून शहरात मखर व गणपती मूर्तीची दुकानेही सजतात. यदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्वच अडचणीत आले आहेत. गणेशमूर्तीकारांकडे काही प्रमाणात ऑर्डर असल्याने शटर बंद करुन का होईना त्यांचे कारखान्यात काम सुरु आहे. परंतू मखर व्यावसायिकांना अद्याप कोणताच मार्ग सापडलेला नाही. याविषयी व्यावसायिक शंकर मुद्रे म्हणाले यावर्षी आम्ही मखर बनविलेच नाहीत. कागदी पुठ्ठ्यांपासून आम्ही मखर बनवून त्यांची विक्री करतो, परंतू लॉकडाऊनमुळे आम्हाला ना पुठ्ठे उपलब्ध झाले आहेत, ना इतर सजावटीचे साहित्य. तसेच ऑर्डर मिळण्याचीही शक्यता नसल्याने यावर्षी आम्ही मखर न बनविण्याचाच निर्णय घेतला आहे. प्लायवूड व कापडी मखर बनविणारे व्यावसायिक प्रतिक पांचाळ म्हणाले, पारंपारिक व्यवसाय म्हणून आम्ही नोकरी सांभाळत दरवर्षी काही प्रमाणात मखर तयार करतो. यंदा मात्र कोरोनामुळे आर्थिक संकटात सारेच सापडले आहेत, तसेच मखर व्यावसायिकही सापडले आहेत. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केल्याने नागरिक मखराची सजावट करण्यास कितपत प्राधान्य देतील याविषयी आम्हाला खात्री नाही. त्यामुळे यंदा व्यवसायात गुंतवणूक न करण्याचा आम्ही विचार केला आहे. त्यामुळे अद्याप मखर बनविलेले नाही. काही ग्राहक आमचे बांधलेले आहेत, त्यांच्याकडून मागणी आल्यास आम्ही शिल्लक मालातून त्यांना मखर बनवून देण्याचा विचार करीत आहोत. 
गणेशोत्सव जवळ आला की मखरांचे प्रदर्शनही महिनाभर आधीपासूनच शहरात भरते. कोरोनामुळे यंदा परिस्थिती वेगळी आहे, आर्थिक मंदीचा फटका त्यात कोरोना संक्रमणामुळे अर्थव्यवस्था पूर्णच कोलमडल्याने लॉकडाऊन शिथिल झाले तरी यावर्षी प्रदर्शन भरवावे किंवा नाही याचा विचार येत्या आठवड्याभरात करु असे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

लॉकडाऊनकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, आर्थिक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे यावर्षी गणपती सजावटीकडे ते किती भर देतील याविषयी शंका आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सजावटीचे साहित्यही फारसे उपलब्ध झालेले नाही. दरवर्षी दिड महिना आधीच आम्ही शहरात मोठे प्रदर्शन भरवायचो. आता ते भरवावे की नाही याचा विचार करीत आहोत. कारण मागणीही त्याप्रमाणात नाही आहे. महिनाआधीपासून नागरिकांचे बुकींग सुरु व्हायचे यंदा आम्हाला केवळ एक दोन फोन आत्तापर्यंत आले आहेत. यासर्व परिस्थितीचा अभ्यास करुनच यावर्षी प्रदर्शन भरवावे, किंवा कशा पद्धतीने पुढे व्यवसाय करावा याचा विचार सुरु आहे. 

निशिकांत मोडक,
विनित एंटरप्रायझेस मखर उत्पादक

 

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com