Special Report | कोरोना नियमावली टॅक्‍सीचालकांच्या मुळावर! बॅंकेच्या तगाद्यामुळे वाहन विकण्याची वेळ

Special Report | कोरोना नियमावली टॅक्‍सीचालकांच्या मुळावर! बॅंकेच्या तगाद्यामुळे वाहन विकण्याची वेळ

मुंबई ः मुंबईत टॅक्‍सी सुरू होऊन काही महिने उलटले आहेत; मात्र टॅक्‍सी व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आला नाही. मुंबईच्या रस्त्यावर अजूनही केवळ 60 टक्के टॅक्‍सी धावत आहेत. त्यातही सरकारने प्रवासी क्षमतेच्या नियमावली आखून दिल्या आहेत. दुसरीकडे लोकल सेवा सर्वांसाठी सुरू न झाल्यामुळे टॅक्‍सीचालक संकटात आले आहेत. कोव्हिडकाळात टॅक्‍सीचालकांचे बसलेले आर्थिक गणित अजूनही ताळ्यावर आलेले नाही. दुसरीकडे मात्र बॅंकेचे हप्ते फेडायचे कसे हा प्रश्‍न कायम आहे. 

मुंबई शहर अनलॉक होत असताना शहराची ओळख असलेल्या काळी टॅक्‍सीचे चाक अजूनही थांबलेलेच आहे. सरकारने टॅक्‍सी सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र त्यातही प्रवासी संख्येच्या अटी-शर्तीसह त्यामुळे टॅक्‍सीचालकांना दिवस-दिवस उभे राहूनही प्रवासी मिळत नाहीत. कोव्हिडमुळे बहुतांश परप्रांतीय टॅक्‍सीचालक आपापल्या राज्यात निघून गेले; मात्र त्यातील केवळ 30 ते 40 टक्के मुंबईत परतल्याचे टॅक्‍सिमेन युनियनचे अध्यक्ष कॉड्रोस यांनी सांगितले. दुसरीकडे अनेक टॅक्‍सीचालक हे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथे राहतात; मात्र त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईत येणे कठीण होते. या सर्व अडचणींमुळे मुंबईत केवळ 60 टक्के टॅक्‍सी रस्त्यावर धावत आहेत, अशी माहिती कॉड्रोस यांनी दिली. 

अजूनही मोठ्या टॅक्‍सीमध्ये चार प्रवासी घेण्याचा तर छोट्या टॅक्‍सीत दोन प्रवासी घेण्याचा नियम कायम आहे. त्यातही सर्वांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने रेल्वेस्थानकावरून चालणाऱ्या शेअर टॅक्‍सीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केवळ टॅक्‍सीमध्ये कोरोनाची लागण होते का? 
- सुभाष पोळ,
सरचिटणीस, मुंबई टॅक्‍सीचालक-मालक संघटना 

गेल्या 18 वर्षांपासून दादर ते केईएम अशी शेअर टॅक्‍सी चालवायचो. त्यातून घर चालवण्याइतपत पैसे सुटायचे; मात्र लॉकडाऊन लागले आणि व्यवसाय ठप्प झाला. रिझर्व्ह बॅंकेने कर्ज फेडण्याची सवलत दिली; मात्र सवलत संपल्यावर टॅक्‍सीचा धंदाच उरला नाही. त्यामुळे बॅंकेचे हप्ते फेडायचे कसे? शेवटी केवळ दोन लाखाला टॅक्‍सी विकली आणि मुंबई सोडून साताऱ्यातील मूळगावी परतलो. टॅक्‍सी व्यवसाय जाग्यावर येणे कठीण आहे. 
- सचिन कोकाटे,
टॅक्‍सीचालक 

टॅक्‍सीचा मार्ग खडतर 
- लोकल सेवा पूर्णपणे सुरू न झाल्याने व्यवसाय मंद 
- अल्प प्रवासी क्षमतेच्या नियमाने आर्थिक गणित बिघडले 
- केवळ 30 टक्के परप्रांतीय टॅक्‍सीचालक परतले 
- टॅक्‍सीत एक प्रवासी जास्त झाल्यास दंड 
- शेअर टॅक्‍सीचा धंदा बुडाला 
- टॅक्‍सीवरच प्रवाशांचे बंधन का? 

Corona rules problematic to taxi drivers Time to sell a vehicle due to bank loan 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com