
नवीन वर्षाच्या तोंडावर राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसते. राज्यातील 12 शहरांमध्ये 5 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने ही शहरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या तोंडावर राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसते. राज्यातील 12 शहरांमध्ये 5 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने ही शहरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या महिन्याभरात दररोज पाच हजार रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 3 हजारावर आली आहे.
राज्यातील गडचिरोलीत जिल्ह्यात पाच तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, अमरावती जिल्ह्यात केवळ चार नव्या रुग्णांची नोंद झाली. धुळे आणि वाशिममधील तीन , उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव इथं दोन आणि सांगलीत केवळ एका रुग्णाची नोंद झाली.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
महिन्याभरापूर्वी याच जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा दुहेरी आकडा होता. 28 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत 31 रुग्ण, सिंधुदुर्ग 17, रत्नागिरी 7, परभणी 6, अमरावती 20, धुळे 3, वाशिम 5, उल्हासनगर 28, भिवंडी निजामपुर 14, मालेगाव 8 आणि सांगलीत 5 रुग्णांची नोंद झाली होती. 28 ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत 122, सिंधुदुर्गात 40, रत्नागिरीमध्ये 16, परभणीमध्ये 26, धुळ्यात 8, वाशिममधील 27, उल्हासनगरातील 27, भिवंडी- निजामपूरमध्ये 14, मालेगावमध्ये 2 आणि सांगलीत 29 रुग्ण आढळले होते. मंगळवारी राज्यात कोरोना बाधित 3,018 रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19,25,066 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 54,537 सक्रिय रुग्ण आहेत.
कोविडचा नवीन स्ट्रेन यूकेमध्ये वेगानं पसरत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 21 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांच्या तपासणी आणि चाचण्या घेण्यात येत आहेत. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी सरकारनं सर्व नागरिकांना संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय, लोकांना सामाजिक अंतर कायम राखण्यासाठी, मास्क घालण्यास, हँड सॅनिटायझर्स वापरण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Corona under control in the state Less than 5 patients registered in 12 cities
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )