मुंबईत लवकरच बेडची क्षमता 20 हजारांपेक्षा हून अधिक, पालिका आयुक्तांची माहिती

मुंबईत लवकरच बेडची क्षमता 20 हजारांपेक्षा हून अधिक, पालिका आयुक्तांची माहिती

मुंबई: सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण 20 हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे.  दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने याप्रमाणे ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे. जून ते नोव्‍हेंबर 2020 या कालावधीत महानगरपालिकेकडे ताब्‍यात असलेली खासगी लहान रुग्‍णालयांची सुमारे 2 हजार 269 रुग्‍णशय्या क्षमता महानगरपालिकेने आता पुन्‍हा ताब्‍यात घेतली आहे. यामध्‍ये 360 अतिदक्षता उपचारांसाठी आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत कोविड उपचारांसाठी रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. आजही 650 आयसीयू बेड आणि 250 व्‍हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. आवश्‍यकतेनूसार एकूण खाटा वाढविण्‍याची कार्यवाही वेगाने सुरु आहे, असे शाश्वत करतानाच कोविड निर्बंधांचे पालन नागरिकांनी केले नाही तर आवश्‍यक त्‍याबाबतीत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही चहल यांनी स्‍पष्‍टपणे नमूद केले.

मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागर‍िकांची संख्‍या सुमारे 40 लाख आहे. आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्‍यात आले आहे. त्‍यातही बीकेसी कोविड केंद्रातील लसीकरण केंद्र हे आजमितीस देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र ठरले आहे. मुंबईतील सध्‍याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे 45 हजार इतकी असून ती दररोज 1 लाखांवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. त्‍यासाठी आणखी 26 खासगी रुग्‍णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्‍हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सध्‍या 59 खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी असून त्‍यांनी लसीकरणाची दैनंदिन संख्‍या वाढवावी, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. एकत्रित प्रयत्‍नातून लसीकरणाची संख्‍या वाढेल. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्‍यात येईल, असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्‍यांची संख्‍या आणि वेग वाढविण्‍यात आला आहे. चाचण्‍यांची संख्‍या लवकरच 60 हजार प्रतिदिन होणार असून त्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या प्रमाणानुसार बाधितांची संख्‍या दररोज 10 हजारपर्यंत आढळू शकते. मुंबईतील कोविड मृत्‍यू दर देखील आता अल्‍प आहे. वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येसाठी रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन (बेड मॅनेजमेंट) पूर्वीप्रमाणेच वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येत आहे.  कोणत्‍याही परिस्थितीत वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच सरकारी तसेच खासगी रुग्‍णालयात बेड उपलब्‍ध करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. लक्षणे आढळत असलेल्‍या तसेच सहव्‍याधी असलेल्‍या गरजू रुग्‍णांना मागणीनुसार बेड उपलब्‍ध करुन दिले जात आहेत, असेही चहल यांनी नमूद केले.

10 फेब्रुवारी 2021 ते 30 मार्च 2021 या 48 दिवसात एकूण 85 हजार रुग्‍ण आढळले. यात 69 हजार 500 रुग्‍ण हे लक्षणे नसलेले बाधित म्‍हणजे एसिम्‍प्‍टोमॅटिक आढळले. त्‍यांना घरी विलगीकरणात ठेवण्‍यात आले. उर्वरित 15 हजार 500 रुग्‍णांना लक्षणे आढळली. त्‍यातही 8 हजार जणांनाच रुग्‍णालयात दाखल करावे लागले. इतरांना सौम्‍य लक्षणे असल्‍याने औषधोपचाराने ते बरे झाले. सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या खाटांपैकी सुमारे 3 हजार खाटा रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील 450 बेडचाही समावेश आहे. थोडक्‍यात खाटांची कोणतीही कमतरता नाही. यापुढेही कमतरता भासणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता महानगरपालिका प्रशासन घेत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये. रुग्‍णांनी आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आपापल्‍या विभागातील वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधला की त्‍यांना आवश्‍यकतेनुसार बेड पुरवला जाईल, असे सांगून चहल यांनी मुंबईकरांना आश्‍वस्‍त केले.

महानगरपालिकेच्‍या जम्‍बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्‍णालयात 80 टक्‍के खाटा पुन्‍हा कोविड रुग्‍णांसाठी सक्रिय केल्‍या जात आहेत, असे सांगून चहल यांनी सविस्‍तर माहिती द‍िली. ते म्हणाले की, मुंबईत 10 फेब्रुवारी 2021 रोजी 3 हजार 500 इतकी रुग्‍णशय्या व्‍याप्‍ती होती. तर आता 9 हजार 900 रुग्‍णशय्यांवर रुग्‍ण आहेत. पैकी 8 हजार 400 मुंबईतील तर 1 हजार 500 मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मागील 48 दिवसांत एकूण बाधितांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत फक्‍त 5 हजार बेड रुग्‍णांसाठी आवश्‍यक भासले. म्‍हणून रुग्‍णांनी आणि नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आयुक्‍तांनी केले.

हेही वाचा- स्थापत्य अभियंत्याला मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

 मुंबईतील 35 मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये मिळून 4 हजार 800 बेड कोविड रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होते. कोविड संसर्ग मध्‍यंतरी नियंत्रणात आल्‍यानंतर सर्व मिळून 2 हजार 350 रुग्‍णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले होते. संसर्ग वाढत असल्‍याने आता पुन्‍हा 4 हजार 800 ही मूळ कोविड रुग्‍णशय्या क्षमता गाठण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. म्‍हणजेच, लहान आणि मोठे खासगी रुग्‍णालये मिळून 7 हजार रुग्‍णशय्या कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होतील, असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले.

महानगरपालिकेच्‍या जम्बो सेंटर्सविषयी माहिती देताना आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले की, बीकेसी कोविड सेंटर टप्‍पा 2 मध्‍ये सुमारे 750  तर गोरेगांव येथील नेस्‍को कोविड सेंटरमध्‍ये 1 हजार याप्रमाणे रुग्‍णशय्या उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. नेस्‍कोची क्षमता 3 हजार रुग्‍णशय्यांची असून सध्‍या 1 हजार बेड उपलब्‍ध आहेत. बीकेसीमध्‍ये 2,100 बेड क्षमता असून सध्‍या 1 हजार बेड उपलब्‍ध आहेत. रिचर्डसन क्रूडास कोविड सेंटरमध्‍ये 700 बेड उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. फक्‍त जम्‍बो सेंटर्सचा विचार करता एकूण 9 हजार रुग्‍णशय्या उपलब्‍ध असतील. सर्व सरकारी आणि खासगी रुग्‍णालये इत्‍यादी मिळून सुमारे 20 हजारापेक्षा जास्त रुग्‍णशय्या मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार आहेत. 

महानगरपालिका आयुक्‍त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील भव्‍य कोविड केंद्रात कोविड-19 प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी लस महत्‍त्‍वाची असून सर्व पात्र नागर‍िकांनी कोविड लस टोचून घ्‍यावी, असे आवाहन चहल यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना यावेळी केले.

--------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona virus Capacity be increased more than 20 thousand beds in Mumbai soon

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com