कोरोनाबाधितांची घुसमट थांबणार! वाशीच्या प्रदर्शन केंद्रातील 500 खांटांचे ऑक्सिजन सुरू...

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

महापालिकेतर्फे वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात तयार करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमधील 500 खाटांचे ऑक्सिजन यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

नवी मुंबई: महापालिकेतर्फे वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात तयार करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमधील 500 खाटांचे ऑक्सिजन यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित रुग्णांची होणारी घुसमट थांबणार आहे. तसेच शहरातील इतर कोव्हीड रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या या महिलेची यशोगाथा नक्की वाचा

महापालिकेने स्वतःहून पूढाकार घेत वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रात कोट्यावधी रूपये खर्च करून तब्बल 1200 खाटांचे कोव्हीड केअर सेंटर एक महिन्यापूर्वीच सुरू केले आहे. या केंद्रात सामान्य खाटांसहीत ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभागही तयार करण्यात येणार आहे. परंतू त्यापैकी ऑक्सिजन असणारे बेड नसल्यामुळे या केंद्रात अत्यवस्थ असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आणण्यात येत नव्हते. सद्यस्थितीत या केंद्रात सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असणारी 600 कोरोनाबाधित रुग्ण भर्ती आहेत. मात्र ऑक्सिजन व्यवस्था नसल्यामुळे 50 रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली होती. इतर रुग्णांवर औषधोपचार सुरू होते. परंतू उर्वरीत 600 बेड तसेच पडून असल्यामुळे शहरातील महापालिकेच्या व कोव्हीड अधिग्रहीत असणाऱ्या खाजगी रुग्णांवर ताण येत होता.

अचानक! पश्चिम रेल्वेच्या २० निवासी इमारती धोकादायक, कर्मचारी आश्चर्यचकित

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तिव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना अधिकतर श्वसनाचा त्रास होत असतो. त्यांची नैसर्गिकरित्या श्वास घेण्याचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे अशा रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज असते. ही व्यवस्था खाजगी रुग्णालयांमध्ये असल्यामुळे सर्वांचा ओढा त्याच ठिकाणी जास्त आहे. परंतू त्याबदल्यात गरीब रुग्णांची लुटमार सुरू होती. म्हणून प्रदर्शन केंद्रात ऑक्सिजन बेड तात्काळ सुरू व्हावेत याकरीता प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू होत्या. अखेर नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्विकारल्यानंतर आजपासून वाशीच्या प्रदर्शन केंद्रात बसवण्यात आलेली ऑक्सिजन यंत्रणा आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर 50 रुग्णांना हलवण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत 500 खांटांनाही लवकरच ऑक्सिजन लावण्यात येणार आहे.  

 

वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात ऑक्सिजनयुक्त 500 खाटा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच पूढील टप्प्यात आणखीन 500 खाटांना ऑक्सिजन यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना आवश्यक असणारे इन्जेक्शन देखील मागवण्यात आले आहेत. 

अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका  

 

इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार
महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, नेरूळमधील डी. वाय पाटील आणि तेरणा रुग्णालय, कोपरखैरणेतील रिलायन्स रुग्णालय, आणि सिवूड्समधील न्युरोजेन रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटरची व्यवस्था असल्यामुळे अत्यवस्थ असणाऱ्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांचा भरणा याच ठिकाणी केला जातो. या व्यतिरीक्त ऑक्सिजनची व्यवस्था असणारे रुग्णालय नसल्याने या रुग्णालयांवर ताण येत आहे. परंतू आता वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात 500 खाटांना ऑक्सिजन यंत्रणा सुरू झाल्यामुळे रुग्ण या ठिकाणी हलवून ताण कमी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronation infiltration will stop! Oxygen of 500 khantas started at Vashi exhibition center ...