"सरकारने केलेले नियम पाळायचेच नसतील तर..."

"सरकारने केलेले नियम पाळायचेच नसतील तर..."

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि संपूर्ण लॉकडाउनचा इशारा दिला. 'हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल', असे ते म्हणाले. असेच काहीसे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. पुण्यात मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतदेखील मिनी लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.

"पुण्यात मिनी लॉकडाऊन लागू झाला आहे. त्याचे चांगले परिणाम होतात का? रुग्णसंख्या कमी होते का? हे पाहून पुढील निर्णय घेता येईल. लॉकडाऊन कोणालाच नकोय पण सरकारने केलेले नियम पाळायचे नसतील तर पर्यायच शिल्लक राहत नाही. आता लोकांनीच सांगावे की कोणते नियम पाळणार?" अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

"कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी नियम तयार करण्यात आले आहेत. नागरीकांनीही वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मास्क वापरणेही आवश्‍यक आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. व्हेंटिलेटर बेड्‌सची संख्या पुरेशी आहे. कोविडची पहिली लाट होती, तेव्हा नागरिक स्वत:ची काळजी घेत होते. पण आता मात्र जत्रेसारखी गर्दी होत आहे. नियमांचे पालन होताना दिसत नाही. मग आता लोकांनीच सांगितलं पाहिजे की कोणते नियम पाळणं गरजेचं आहे", असा सवाल महापौरांनी जनतेला केला व्यक्त केला.

"आवश्‍यकतेनुसार रुग्णशैय्या वाढविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय तडकाफडकी घेणार नाहीत. ते समाजातील विविध घटकांशी चर्चा करत आहेत. कोविडचे रुग्ण वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणांवर ताण येताना दिसतोय. अशा परीस्थीतीत यंत्रणांनी काहीच निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा करणे योग्य नाही. पुण्यात सध्या मिनी लॉकडाऊन लागू आहे. त्याचे चांगली परिणाम दिसत असतील तर तो पर्यायही इतर ठिकाणी वापरता येऊ शकतो", असे महापौरांनी स्पष्ट केले. "काही लोक नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. पण,आताच्या परिस्थीतीत जीव महत्वाचा आहे हे विसरुन चालणार नाही", असंही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com