esakal | ब्रेक दी चेनचा लग्नसोहळ्यांवर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेक दी चेनचा लग्नसोहळ्यांवर परिणाम

शनिवार-रविवार या दोन दिवस पोलिसांची परवानगी घेऊन लग्नसोहळे करता येणार आहेत. मात्र...

ब्रेक दी चेनचा लग्नसोहळ्यांवर परिणाम

sakal_logo
By
समीर सुर्वे

राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यांवर चांगलाच परिणाम झाला आहे. खरंतर शनिवार-रविवार या दोन दिवस पोलिसांची परवानगी घेऊन लग्नसोहळे करता येणार आहेत. मात्र, या दिवशी सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करता येणार नाही. तर, खासगी वाहनांमधून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे लग्नसोहळा जरी केला तरीदेखील वऱ्हाडी मंडळींना लग्नात पोहोचण्यास अडचण येऊ शकते.

एप्रिल महिन्यात २४ ते २७ तारखेपर्यंत सलग मुहूर्त आहेत. तर, ३० एप्रिलला या महिन्यातील शेवटचा महुर्त आहे. २४ आणि २५ तारखेला विकएन्ड असल्याने या दिवसांमध्ये लग्न कसे करावे असा पेच होता. शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र,पोलिसांची परवानगी घेऊन लग्न करता येईल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शनिवार आणि रविवारी दोन दिवसात सार्वजनिक वाहतूक सामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्याच बरोबर या काळात खासगी वाहानांमधून प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे आता ५० वऱ्हाडी मंडळी तरी कशी उपस्थित राहाणार असा पेच आहे.

कोविडमुळे मागील वर्ष लग्नाचा मोसमच लॉकडाउनमध्ये होता. बोहल्यावर चढलेल्यांची लग्न वर्षभर रखडली आहेत. आता जानेवारी नंतर कोविडचा कहर कमी होऊ लागल्याने या सुट्टीच्या मोसमात लग्नाच्या तारखा ठरविण्यात आल्या आहेत. मात्र,आता पुन्हा कठोर निर्बंधामुळे लग्नांचा बॅन्डचा वाजण्याची शक्यता आहे. गोरेगाव येथील तरुणाचा विवाह गेल्या वर्षी पासून रखडला आहे. आता सुट्टीमध्ये लग्न करायचे होते पण तोही पेच निर्माण झाला आहे.

वऱ्हाडी मंडळींना चाचणी बंधनकारक

लग्नांसाठी फक्त ५० व्यक्तींना उपस्थीत राहाण्याची परवानगी आहे.या सर्वांनी कोविडची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणेही बंधनकारक आहे.असे राज्य सरकारने रविवारी प्रसिध्द केलेल्या आदेशात नमुद केले आहे.तसेच,ज्यांना लसिकरणाची परवानगी आहे त्यांना लसिकरण करणेही बंधनकारक आहे. अन्यथा १ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर, संबंधित हॉल व्यवस्थापनाला १० हजारापर्यंतचा दंड करण्यात येणार आहे.
संपादन - शर्वरी जोशी
 

loading image