Coronavirus: कोरोनामुक्तीकडे चाललेल्या धारावीला दुसऱ्या लाटेचा फटका

Dharavi-Slums-Corona
Dharavi-Slums-Corona
Updated on

मुंबई: शून्यावर रुग्णसंख्या आलेल्या धारावीमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. गेल्या महिन्याभरापासून धारावीसह उत्तर विभागात रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. 22 जानेवारीला धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. त्यावेळी केवळ 10 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यामुळे धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका धारवीलाही बसला असून धारावीतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढतांना दिसत आहे. 

24 मार्चला धारावीत 62 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णसंख्या 4 हजार 531 वर पोहोचली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 237 वर पोहोचली. तर उत्तर विभागात 212 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 15 हजार 747 इतकी झाली. 25 तारखेला धारावीत 58 नवे रुग्ण सापडले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 4 हजार 589 वर पोहोचली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 285 वर पोहोचली. तर उत्तर विभागामध्ये 180 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 15 हजार 927 इतकी झाली आहे. धारावीत दिवसाला सरासरी 50 च्या वर नवे बाधित रुग्ण सापडत असून चिंता वाढली आहे.

धारावी विभागात रुग्णवाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका या परिसराला बसला आहे. दाटीवाटीची वस्ती आणि बाजारांमधील वाढती गर्दी हेदेखील वाढत्या कोरोनारूग्णांचे कारण आहे. तसेच कामानिमित्त कामगारांचा इतर परिसरात वावर आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर यामुळेही हा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. धारावीमध्ये कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोविड चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. दैनंदिन हजार ते 1200 चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी धारावीतील आरोग्य केंद्र, गर्दीची ठिकाणं तसेच महत्वाचे नाके या ठिकाणी अँटीजेन तसेच आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. दैनंदिन 2 हजार चाचण्या करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

विलगीकरण केंद्र वाढवण्यावर भर

बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने क्वारंटाईन होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन ची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या वनिता समाज हॉल मध्ये 300 लोकांची सोय होईल एव्हढी व्यवस्था करण्यात आली आहे. धारावीत आणखी काही हॉल तसेच लॉजे पालिकेने ताब्यात घेतले असून तेथे संस्थात्मक क्वारंटाईन ची व्यवस्था केली जात आहे. आठवड्याभरात 750 पेक्षा अधिक रुग्णांची व्यवस्था होईल एव्हढी सोय करण्यात येत आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका धारावीला बसला आहे. धारावीतील रुग्णसंख्या ही वाढतांना दिसते. मात्र यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे लक्षण विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. केवळ 18 ते 20 टक्के लोकांना लक्षणे आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. चाचण्या वाढवण्यात आल्या असून क्वारंटाईन केंद्राची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे.
- जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर

लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न

धारावीमध्ये लोकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. धारावीतील लोकांसाठी खास लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. एका वेळी 5 अशा प्रकारे दिवसाला 1 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याची तयारी पालिकेने केली आहे. मात्र धारावीकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने दिसते. दिवसाला जेमतेम 100 ते सव्वाशे लोकांचे लसीकरण होत आहे.

लसीकरणाची सर्व भाषांमध्ये जनजागृती

धारावीत लसीकरण वाढावे यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी वेगवेगळया प्रकारे जनजागृती करत आहे. धारावीत तामिळ,तेलगू, मल्याळम,कन्नड,उर्दू आणि हिंदी भाषिक लोकं संख्येने अधिक आहेत. लसीकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी सर्व भाषांमध्ये जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com