esakal | Coronavirus Updates Good News Test Positivity Rate goes Down Mumbai

बोलून बातमी शोधा

Covid-19
दिलासादायक! चाचण्या पॉझिटिव्ह येण्याच्या दरात घट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे Test Positivity Rate-TPR (चाचण्या पॉझिटिव्हीचा दर) हा गेल्या 5 ते 6 दिवसांत 20 ते 25 टक्क्यांवरुन खाली आला असून सध्या 17 टक्क्यांवर स्थिरावला आहे. जर आणखी कडक निर्बंध लावले, तर हा दर आणखी कमी होऊन मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येईल, असे मत कोविड राज्य टास्क फोर्स समितीचे डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे. 7 एप्रिल या दिवशी कोविड चाचण्या झाल्यानंतर रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत पोहचले होते. ते आता 17 टक्क्यांवर पोहोचले आहे. शिवाय गेल्या 5 ते 6 दिवस हे दर 16 ते 18 टक्क्यांवर स्थिरावले होते.

वर्षभरात हे प्रमाण सरासरी 10 टक्क्यांच्या आत होते. पण फेब्रुवारी व मार्चमध्ये वाढलेल्या रुग्णांच्या आकड्यामुळे आणि चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे या दरात वाढ झाली. हा दर 7 एप्रिलपर्यंत 20 टक्क्यांपर्यंत होता. आता सहा दिवसांपासून हा दर 17 टक्क्यांवर आला आहे. महानगर पालिका आता अनेक सार्वजनिक ठिकाणी कोविड चाचण्या करत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण दिवसाला किमान 50 हजारांच्या घरात आहे. याशिवाय, या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यापूर्वी, लक्षण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात होती. पण, आता सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे, चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

मुंबईत आतापर्यंत 5 लाख 27 हजार 119 रुग्ण आढळले आहेत. तर, 46 लाख 50 हजार 187 चाचण्या झाल्या आहेत. सरासरी रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण सद्यस्थितीत 11.19 टक्के आहे. 11 एप्रिल या दिवशी 39 हजार 398 एवढ्या चाचण्या झाल्या होत्या. तर, 9 हजार 989 एवढे रुग्ण सापडले होते.

पॉझिटीव्हीटीचे प्रमाण (टक्केवारीत)

12 एप्रिल - 6,905 - 17.3

11 एप्रिल - 9,989 - 17.7

10 एप्रिल - 9,327 - 18

9 एप्रिल - 9,200 - 18

8 एप्रिल - 8,938 - 18

7 एप्रिल - 10,428 - 20

गेल्या पाच दिवसांपासून मुंबईचा पॉझिटिव्ही रेट कमी झाला असून तो सध्या जवळपास 16 ते 18 टक्के आहे. आता आपण स्थिरावत आहोत. चाचण्या वाढवल्यामुळे जो टीपीआर 25 टक्के होता, तो आता कमी झाला आहे. आता कडक निर्बंध लावल्यानंतर रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आली आहे, असे टास्क फोर्स सदस्यांनी सांगितले. हे निर्बंध जर कायम राहिले तर आणि नागरिकांनी कोविड 19 नियमांचे पालन केल्यास दोन आठवड्यांनी रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळेल, असेही डॉ. जोशी म्हणाले.

दरम्यान, जर रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असून जास्तीत जास्त कोविड सेंटर्स उभारुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. पालिकेने मार्चपासून कोविड-19 चाचण्या सुरू केल्या आहेत. सध्या सरासरी 40,000 ते 50,000 चाचण्या होतात. याचा चांगला परिणाम आणखी काही दिवसांनी दिसून येईल, असंही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केलं.

(संपादन- विराज भागवत)