भयंकर! कोरोनारुग्णाला दिले तब्बल 21 लाखाचे बिल; प्रविण दरेकर यांनी भेट दिल्यावर समोर आला प्रकार

कृष्ण जोशी
Wednesday, 2 September 2020

गरीब कोव्हिड रुग्णाला एकवीस लाखांचे अव्वाच्या सव्वा बिल दिल्याचे कळल्यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालाडच्या रुग्णालयावर धडक मारली.

मुंबई : गरीब कोव्हिड रुग्णाला एकवीस लाखांचे अव्वाच्या सव्वा बिल दिल्याचे कळल्यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालाडच्या रुग्णालयावर धडक मारली. पण त्याआधीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र रुग्णालयाने अडवलेला मृतदेह नातलगांच्या ताब्यात मिळाला व जादा बिल देखील माफ झाले. 

येत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती

मालाडच्या लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आज हा प्रकार घडला. एका रुग्णाला 21 लाखांचे बिल देण्यात आले. यासंबधी माहिती दरेकर यांना मिळाली. त्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय या गरीब कुटुंबाने घेतला. त्यामुळे दरेकर यांनी तेथे जाऊनच रुग्णालयाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार ते आज सकाळी गेले असता त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता, तरीही उरलेले 13 लाख रुपये देईपर्यंत रुग्णालयाने मृतदेहदेखील अडवून ठेवला. दरेकर यांनी तेथे जाऊन रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला व त्यांच्या बिलातील फोलपणा दाखवून दिला. त्यामुळे रुग्णालयाने उरलेले बिल माफ केले व मृतदेहदेखील ताब्यात दिला, असे दरेकर यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी

बिल भरेपर्यंत मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. हे रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी ्अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

कोव्हिडवर कोणतीही हमखास अशी ट्रीटमेंट सध्या नाही, त्यामुळे रुग्णाची तब्येत व अवस्था पाहून प्रयोग करूनच उपचार पद्धती वापरावी लागते. या रुग्णावर व्यवस्थित उपचार करण्यात आले होते. रुग्णाला वैद्यकीय कर्ज मिळावे या त्यांच्याच नातलगांच्या विनंतीवरून मला न विचारता कनिष्ठ कर्मचाऱ्याने जादा बिल दिले होते. अन्यथा आम्ही त्यांना जास्त बिल आकारणार नव्हतो, असे रुग्णालयाच्या एचआर विभागप्रमुख व अँडमिनिस्ट्रेटर सुवर्णा जगताप यांनी सकाळ ला सांगितले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corono patient bill of Rs 21 lakh; The type came to the fore when Pravin Darekar visited