ठेका मिळवण्यासाठी नगरसेविकेने धमकावले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सध्या नगरसेविका फरार असून रबाळ्यात त्यांच्यासह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नवी मुंबई : दिघा येथील ग्लोबोटॉनिक्‍स कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्‍ट मिळावे, यासाठी नगरसेविका दीपा गवते व त्यांचे पती राजेश गवते यांनी 25 ते 30 जणांसह कंपनीमध्ये जाऊन व्यवस्थापकाला धमकावत तेथील कामगारांनादेखील डांबून ठेवले होते.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी नगरसेविका दीपा गवतेसह एकूण 27 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच दीपा यांचे पती राजेश गवते व माजी परिवहन समिती सदस्य विरेश सिंग यांच्यासह धर्मेंद्र वाल्मिक या तिघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिस सध्या नगरसेविका दीपा गवते यांच्यासह इतरांचा शोध घेत आहेत. 

दिघा येथील मुकंद कंपनीजवळ काही महिन्यांपूर्वीच ग्लोबोटॉनिक्‍स ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. या कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्‍ट आपल्याला मिळावे, यासाठी दिघा येथील नगरसेविका दीपा गवते आपल्या पतीसह इतर 25 ते 30 जणांना घेऊन गुरुवारी (ता.22) कंपनीमध्ये दाखल झाल्या. या वेळी त्यांनी जबरदस्तीने कंपनीमध्ये प्रवेश करत कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकावून सदर कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्‍ट आपल्यालाच मिळावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

या वेळी कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यांना नकार दिल्यानंतर दीपा गवते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंपनीमध्ये गोंधळ घालून जबरदस्तीने कंपनीतील कामगारांना अर्धा तास कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कंपनीमध्ये धाव घेऊन कामगारांची सुटका केली. 

या घटनेनंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नगरसेविका दीपा गवते, त्यांचे पती राजेश गवते व इतर अशा एकूण 27 जणांवर डांबून ठेवणे, बेकायदा जमाव जमवणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यातील राजेश गवतेंसह माजी परिवहन सदस्य विरेस सिंग, धर्मेंद्र वाल्मिक या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली. सध्या त्यांना न्यायालयाने 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corporator threatened to get a contract