...भ्रष्टाचाराची कीड 'इथेही'; एसीबी चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

ठाणे जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या तब्बल तीन जणांना तीन महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या विभागातील लाचखोरी वारंवार घडत असल्याने आजच्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले.

ठाणे : जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या तब्बल तीन जणांना तीन महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या विभागातील लाचखोरी वारंवार घडत असल्याने आजच्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले आहे. स्थायी समितीत झालेल्या चर्चेत तर केवळ एका-दोघांची नाही, तर सर्व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत आणि गोकुळ नाईक यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली. ठाणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अनेक वेळा वादग्रस्त ठरलेला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहायक उपशिक्षण निरीक्षक हिरामण माळी (५६) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमिक विभागातील कनिष्ठ लिपिक रवींद्र लक्ष्मण पवार (४५) याला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतरही येथील लाचखोर अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव झालेली नसल्याने आसोसे गावातील शाळेच्या केलेल्या बांधकामाच्या बिलाची फाईल पुढे पाठवण्यासाठी वरिष्ठ सहायक दीपक साळवे (४८) यानेदेखील लाच मागितली होती. त्यालाही लाच घेताना अटक करण्यात आली.

ही बातमी वाचली का? महसूल कर्मचारी नोकरीला कंटाळले

शिक्षकांचा उपचाराअभावी मृत्यू
शिक्षण विभाग लाचखोर अधिकारी चालवत आहेत की वरिष्ठ अधिकारी चालवत आहेत, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. या लाचखोर अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची वैद्यकीय बिले तीन ते चार वर्षांपासून रखडलेली असल्याचा आरोप या वेळी करण्यात आलेला आहे. तसेच वैद्यकीय बिले वेळेवर दिली न गेल्याने पुढील खर्च झेपत नसल्याने काही शिक्षकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप सुभाष घरत यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption in Education Department of Thane Zilla Parishad