कोव्हिडमुळे गारगाई प्रकल्प लांबणीवर; मुंबईकरांना आणखी काही काळ पहावी लागणार वाट

कोव्हिडमुळे गारगाई प्रकल्प लांबणीवर; मुंबईकरांना आणखी काही काळ पहावी लागणार वाट


मुंबई : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी महापालिकेने पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्‍यातील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोव्हिडमुळे या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेल्या 503 कोटी रुपयांपैकी तब्बल 440 कोटी रुपयांना कात्री लावण्यात आली आहे. या प्रकल्पातून मुंबईला रोज 440 दशलक्ष लिटर पाणी मिळणार होते. मात्र, यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

प्रकल्पासाठी या वर्षात जमिन हस्तांतरण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच प्रत्यक्ष धरण बांधकामाच्या निवीदा मागविण्यात येणार होत्या. पुढील 3 ते 4 वर्षात हा प्रकल्प पालिकेला पुर्ण करायचा आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील 503 कोटी 51 लाख रुपयांपैकी 199 कोटी 40 लाख रुपये पुनर्वसनावर खर्च करण्यात येणार होते. मात्र, सुधारीत अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या खर्चाला तब्बल 440 कोटी रुपयांची कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त कागदी बाबींची पुर्तता करण्यावर महापालिका भर देणार आहे. 

शहरात नियमितपणे रोज 3 हजार 850 दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा होता. मात्र, प्रत्यक्ष गरज 4100 दशलक्ष लिटर आहे. 2030 पर्यंत पाण्याची दैनंदिन मागणी 5 हजार 910 दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याचा अंदाज पालिकेने यापुर्वी केलेल्या अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे गारगाई धरणानंतर पिंजाळ प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, आता गारगाईलाच विलंब होणार असल्याने पिंजाळ प्रकल्पालाही त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

नगरसेवकांना यंदा त्यांनी सुचवलेल्या कामांसाठी निधी वाढवून दिला आहे. मात्र, ज्या कामांचे नियोजन नव्हते, जी कामे तातडीची नव्हती त्यांचा निधी गारगाई, कोस्टल रोड तसेच बेस्टचे अनुदान अशा कामांसाठी वापरता आला असता, असे मत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी नोंदवले. शिवसेनेने सर्वाधिक निधी मिळवला आहे. त्यामुळे मुंबईचा असमान विकास होणार आहे. दुसऱ्या बाजूला गारगाई हा प्रकल्प संपुर्ण मुंबईसाठी होता. ज्या विभागात आजही पाण्याच्या समस्या आहेत तेथील नागरिकांना प्रकल्प पुर्ण झाल्यास दिलास मिळू शकला असता, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

असा आहे प्रकल्प
-गारगाई प्रकल्पासाठी तब्बल 840 हेक्‍टरची जमिन पाण्याखाली येणार आहे.
-597 हेक्‍टर वन विभागाची, 73 हेक्‍टर नदी खाली आणि 170 हेक्‍टर खासगी जमिन आहे.
- सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
-गारगाई धरण ते शहापूर तालूक्‍यातील मोडकसागर तलावापर्यंत जलबोगदे बांधण्यात येणार.
- या जलबोगद्यातून पाणी मोडकसागरमध्ये आणून ते मुंबईत पाठवणार.

या निधीत कपात
- जमिन अधिग्रहण, पुनर्वसन- 129 कोटी 40 लाख
- वन विभागाला नुकसान भरपाई - 190 कोटी
- वृक्षारोपण तसेच इतर वन विषक कामांसाठी - 76 कोटी

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com