Corona Vaccine: कोविड लस खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध करण्याची मागणी

भाग्यश्री भुवड
Sunday, 24 January 2021

लसीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयांनी हेल्थकेअर वर्कर्सची यादी मुंबई पालिकेला दिली आहे.

मुंबई: असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये, लोकांच्या अधिकाधिक संपर्कात येणाऱ्या हेल्थ केअर वर्कर्सना  प्राधान्याने लसीकरण केले जावे, यावर चर्चा करण्यात आली. असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्स हा मुंबई आणि पुणे येथील 53 ट्रस्ट हॉस्पिटलचा समूह आहे. लसीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयांनी हेल्थकेअर वर्कर्सची यादी मुंबई पालिकेला दिली आहे. त्यांना लसीकरण करून घेण्यासाठी पालिकेने ठरवलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे. मात्र या ठिकाणी अनुपालन पुरेसे केले जात नसल्याची समस्या आहे. तसेच जोपर्यंत हेल्थ केअर कर्मचाऱ्यांची माहिती देत नाही तोपर्यंत कोणी लस घेतली आहे ते रुग्णालयांना समजत नाही.

कोविड लसीकरण केंद्रे म्हणून भूमिका बजावायची परवानगी द्यावी

जास्तीत जास्त हेल्थ केअर वर्करना जलदपणे लस देण्याची मोहीम पार पाडत असताना, स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरण केंद्रे म्हणून भूमिका बजावायची परवानगी, द्यावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेकडे मांडण्याला व्यवस्थापकीय समितीने एकमताने मंजूरी दिली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुग्णालयांच्या व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास होईल मदत

असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि पी.डी. हिंदूजा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांनी सांगितले, “जास्तीत जास्त अनुपालन करणे, नियंत्रण ठेवणे, सोय देणे आणि सरकारचा खर्च कमी करणे, या दृष्टीने असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत खासगी आणि ट्रस्ट हॉस्पिटलना स्वतःच्या हेल्थ केअर वर्करना लसीकरण करण्यासाठी केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेकडे ठेवण्याला मंजुरी दिली आहे.  

हेल्थकेअर वर्कर्ससाठी अशाच प्रकारची लसीकरण मोहीम राबवण्यासाठी अनेक राज्ये खासगी रुग्णालयांशी भागीदारी करत असताना, मुंबईनेही हेल्थ केअर वर्कर्सच्या मोहिमेमध्ये रुग्णालयातील हेल्थ केअर वर्कर्सना भागीदार म्हणून घ्यायला हवे. सध्या गरजेनुसार, रुग्णालयांना हेल्थ केअर वर्कर्सना लसीकरण केंद्रांवर पाठवावे लागत असल्याने रुग्णालयांच्या व्यवस्थेवरील ताण वाढतो आहे. त्यांची नेहमीची कामे बाजूला ठेवून पालिकेला त्यांना या कर्मचाऱ्यांना लसीकरण केंद्रांवर पाठवावे लागत आहे.”

हेही वाचा- Corona Vaccination: लसीकरण केंद्रांवर होतेय गर्दी, केंद्र आणि युनिट्स वाढवण्याचा विचार

“लसीकरणाच्या मोहिमेचे विकेंद्रीकरण करायचे ठरले तर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार अनेक पटीने अधिक हेल्थ केअर वर्कर्सपर्यंत पोहोचेल. तसेच, तेथे चांगले अनुपालन राखले जाईल, पण तरीही ही प्रक्रिया सर्वांसाठी सोयीस्कर असेल आणि तेथे उत्तम नियंत्रणही ठेवले जाईल आणि चांगली सोय केली जाईल. लसीकरणासाठी लागणाऱ्या सिरिंजसारख्या वस्तू रुग्णालये स्वतःच्या वापरणार असल्याने लसीकरणाचा खर्चही खासगी आणि ट्रस्ट हॉस्पिटलच्या मदतीने विभागला जाईल. गरज वाटल्यास, पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आपल्या आवारामध्ये लसीकरण करण्याचीही रुग्णालयांची तयारी आहे”,असेही त्यांनी नमूद केले.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid vaccine should made available private hospitals demanded by Association of Hospitals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid vaccine should made available private hospitals demanded by Association of Hospitals