मुंबईत अग्निशस्त्र घेऊन आलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

अनिश पाटील
Tuesday, 10 November 2020

दोन्ही आरोपींकडून 3 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मुंबईतल्या कॉटनग्रीन परिसरातल्या रेल्वे ब्रीजखाली सापळा रचून खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केलेली आहे. 

मुंबई:  पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई करत हत्या आणि चोरीच्या इराद्याने अग्निशस्त्र घेऊन मुंबईत आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकलेल्या आहेत. दोन्ही आरोपींकडून 3 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मुंबईतल्या कॉटनग्रीन परिसरातल्या रेल्वे ब्रीजखाली सापळा रचून खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केलेली आहे. 

मुंबई खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी दोन संशयित इसम दिसताच दोन वेगवेगळ्या पथकांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेतले आणि झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 3 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत काडतुसे आढळून आली.  पोलिसांनी आरोपीसोबत त्यांची मोटारसायकलसुद्धा जप्त केलेली आहे.

याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधले रहिवासी असल्याची माहिती समोर आली. अन्वर इलाही फझल इलाही (55), मोहम्मद इनाम वासीन अलवी(28) अशी दोन्ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक वाचाः  कर्करोगावरील औषधे स्वस्त; 42 औषधांच्या किमती 90 टक्‍क्‍यांनी कमी

आरोपी कोणाच्या हत्येच्या उद्देशाने मुंबईत एके होते याचा शोध पोलिसांकडून सुरू असून आरोपी अन्वर इलाही याला 2001 साली मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती.  ज्यामध्ये तो 10 वर्षांची शिक्षा भोगून नुकताच बाहेर आला होता अशी माहिती समोर आली आहे. शिवाय दोन्ही आरोपी सराईत चोर आयुब चिकना टोळी हस्तक आहेत अशी माहिती खंडणी विरोधी पथकातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोपी मोहम्मद अलवी याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमध्ये विविध पोलिस ठाण्यात 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Crime Branch arrests two accused for carrying firearms Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Branch arrests two accused for carrying firearms Mumbai