दाऊदच्या हस्तकाचा धंदा उध्वस्त केल्यानंतर NCBची डोंगरीत पुन्हा मोठी कारवाई

अनिश पाटील
Saturday, 23 January 2021

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली.

मुंबई  ः केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. याप्रकरणी भिवंडीतील सराफ विक्रांत जैन याला अटक केली. प्राथमिक तपासात पाच वर्षांत या टोळीने तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ विकल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 
दोनच दिवसांपूर्वी वानखडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने डोंगरी परिसरातील अमली पदार्थ कारखान्यावर कारवाई केली होती. यात एनसीबीने दोन कोटी 18 लाख रुपयांची रोकड आणि 12 किलो अमली पदार्थांसह शस्त्रेही हस्तगत केली होती. 

या प्रकरणी पोलिसांनी गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणसह तिघांना अटक केली. आरोपींच्या चौकशीत आणि त्यांच्याजवळ मिळालेल्या डायरीतून दाऊदचे हस्तक मुंबईत अमली पदार्थ विकून दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या टोळीने गेल्या पाच वर्षांत 1,500 कोटी रुपयांचे अमली पदार्थ विकून हजारो कोटी रुपये हवालामार्फत दाऊदला पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. 
याशिवाय चिंकू पठाण यांच्याजवळ आढळलेल्या डायरीत पोलिसांना दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि फहिम मचमच यांच्याही नावाचा उल्लेख आढळून आला आहे. दरम्यान, एनसीबी पथकाचे अधिकारी समीर वानखेडेंनी शुक्रवारीही डोंगरी परिसरात चार ठिकाणी मोठी कारवाई केली. सोने तस्करीची साखळी उद्‌ध्वस्त झाल्यानंतर दाऊद टोळीने अमली पदार्थांची तस्करी करण्याचे ठरवल्याचे आरोपींच्या चौकशीतून पुढे आले आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारी कारवाईदरम्यान एनसीबीने दाऊदच्या आणखी एक साथीदार सलमान नासीर पठाण याला अटक केली. डोंगरी परिसरात अजूनही छापे घालण्यात येत आहेत. काही इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अशा तस्करीतून दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीची ही जप्त केली जाणार आहे. याशिवाय या सर्व गुन्ह्यांसंदर्भाची माहिती ईडी आणि एनआयएलाही दिली जाणार आहे. 

 

येत्या काही दिवसांत मुंबईतून दाऊदची दहशत संपवणार आहोत. अमली पदार्थांच्या तस्करीला कायमचा चाप लावायचा आहे. 
- समीर वानखडे,
एनसीबी अधिकारी 

crime news mumbai Saraf arrested in Bhiwandi ban chemical selling of Rs 1,500 crore in five years

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news mumbai Saraf arrested in Bhiwandi ban chemical selling of Rs 1,500 crore in five years