'चल तुझ्याजवळचे मोबाईल, पैसे काढ', असे म्हणत इस्टेट एजंटवर गोळीबार

विक्रम गायकवाड
Sunday, 24 January 2021

पेण येथून नवी मुंबईत मित्राला भेटण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर अज्ञात त्रिकुटाने आपल्याकडील रिवाल्वरने गोळीबार करून पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री खारघर मध्ये घडली.

नवी मुंबई : पेण येथून नवी मुंबईत मित्राला भेटण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर अज्ञात त्रिकुटाने आपल्याकडील रिवाल्वरने गोळीबार करून पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री खारघर मध्ये घडली. या गोळीबारात प्रतिक आहेर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार लुटमारीचा उद्देशाने घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील जखमी प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून त्याचा इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रतीक पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून

नवी मुंबईत मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल हायवेने पनवेलच्या दिशेने जात होता. यावेळी तो खारघर येथील कोपरी गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आतमध्ये जाऊन सिगरेट पीत उभा होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाईल, पैसे व मोटरसायकलची चावीची मागणी केली. मात्र, प्रतिकने त्यांना नकार दिल्याने अज्ञात त्रिकुटातील एकाने प्रतीक जवळचा मोबाईल जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  प्रतीकने विरोध केल्यानंतर सदर त्रिकुटापैकी एकाने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आपल्याकडील रिवॉल्वरने एक गोळी झाडली. त्यानंतर तिघांनी त्या ठिकाणावरुन पलायन केले. या गोळीबारात प्रतीक जखमी झाल्यानंतर याबाबतची माहिती एका नागरिकाने पोलिसांना कळविल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रतीक आहेर याला खारघर सेक्टर-7 मधील सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील उपचारासाठी त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून  लुटमारीच्या उद्देशाने गोळीबाराची घटना घडली असण्याची शक्यता  परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केली. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे करीत आहेत.

crime news navi mumbai Firing in Kharghar on an estate agent in Pen

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news navi mumbai Firing in Kharghar on an estate agent in Pen