आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

मुंबई: पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.  ही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एक ही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही  हे ही त्यांनी स्पष्ट केले तसेच आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचे ही त्यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, यामध्ये  मेट्रो 3 आणि 6 नंबरच्या लाईनचे एकत्रिकरण करण्यात आल्याने जनतेचा एक ही पैसा वाया जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्ग येथील ही जमीन शुन्य पैशांमध्ये मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा आवर्जुन उल्लेख केला.

आरेतील 800 एकर जंगल राखीव घोषित

आरे मधील 800 एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. असे करतांना तिथे असणाऱ्या आदिवासी पाड्यातील लोकांच्या आणि तबेलांच्या अ‍स्तित्वाला धोका न लावता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले हे वन शासनाने राखीव जंगल म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणासाठी वापरता येईल त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधी ही वाया जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्या आसपासचे पर्यावरण जपतांना करण्यात आलेले हे काम ऐतिहासिक स्वरूपाचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले. त्यांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या शिकवणुकीचे यावेळी स्मरण केले. ते म्हणाले की, आपल्या संतांची शिकवण ही आपल्या जगण्याचा आयुष्यभराचा संस्कार आहे. आजही कोरोना आपल्यातून गेला नाही त्यामुळे आतापर्यंत  सर्व धर्मियांनी जसे सगळे सण समारंभ साधेपणाने साजरे केले तसेच येणारे नवरात्र आणि दसरा दिवाळी हे सणही साधेपणाने साजरे करावेत.

नुकसानभरपाई मिळणार

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसाने ही पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता निश्चिंत रहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात सांगड घालणार

जे विकेल तेच पिकेल ही योजना शासनाने राबविण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे. शासनाने महाओनियन चे सहा प्रकल्प राज्यात सुरु केले. केवळ कांद्यांसाठीच नाही तर कापूस, तूर, मुग,  अशा विविध शेतपिकांसाठी साठवणूकीची, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था शासन उभी करत आहे.

कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही

केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी शासन संवाद साधत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

शिवभोजनच्या 2 कोटी थाळ्यांचे वितरण

राज्य शासनाने कर्जमुक्ती, विक्रमी कापूस खरेदी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत  लॉकडाऊन काळात  आज ही 5 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले आहे.  शिवभोजन योजनेत आतापर्यंत 2 कोटी 2 लाख लोकांनी योजनेचा लाभ घेतल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाच्या स्थितीची माहिती

राज्यात आतापर्यंत 449 कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी 15 लाख 17 हजार 734 कोरोना रुग्णांपैकी 12 लाख 55 हजार 779 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती दिली. दुर्देवाने राज्यात 40 हजार मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. राज्यात व्हेंटिलेटरवर सध्या सव्वा दोन हजार रुग्ण असून काही रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. जवळपास 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये मध्यम ते सौम्य लक्षणे असल्याचेही ते म्हणाले.

कोविड योद्ध्यांचा गौरव

मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्ध्यांच्या कामाचा यावेळी गौरव केला तर नागरिक अजूनही भीती पोटी वेळेत उपचाराला येत नसल्याची खंत ही व्यक्त केली. वेळेत उपचार घेतल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाचा धोका आपण टाळू शकतो असेही ते म्हणाले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी

महाराष्ट्र हे जगातील एकमेव असे राज्य असेल जिथे जनतेला विश्वासात घेऊन शासन कोविड विरोधात लढा उभारत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांसह पोलीस आणि इतर  सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. भंडारा येथील पुष्पा वाढई, भारती वासनिक अहमदनगरचे सुदाम जाधव या कोविड योद्ध्यांच्या कामाचा त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात उल्लेख केला. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत काम करतांना त्यांनी ऑक्सीजन कमी झालेल्या व्यक्तींना, गरोदर महिलेला  त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या टेस्ट केल्या आणि आज ही सगळी मंडळी बरी होऊन घरी गेल्याची माहिती ही त्यांनी दिली. हीच सतर्कता आवश्यक असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मोहिमेत आतपर्यंत 1 कोटी 18 लाख 56 हजार कुटुंबांना भेट देऊन त्यांची आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती दिली . त्यांनी आरोग्य तपासणीसाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले.

त्रिसुत्रीचे पालन करा
मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचे तंतोतंत पालन करा, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना काळजी घ्या, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील नो मास्क नो एंट्री सारख्या नाविन्यपूर्ण कल्पनेचा ही यावेळी उल्लेख केला.

काळजी घ्यायचीच आहे
कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. शासनाची जनतेप्रती जबाबदारी आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असे आवाहन ही केले.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com