''त्यांनी मला ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेल' - एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

तुषार सोनवणे
Friday, 23 October 2020

एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला. मुंबईतील वाय बी सेंटर मध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

मुंबई - खानदेशातील मातब्बर नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला. मुंबईतील वाय बी सेंटर मध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

''राजकारणात गेली कित्येक वर्षे मी संघर्ष केला. उत्तर महाराष्ट्रामध्ये सहा जागा लोकसभेसाठी लढवल्या जात असत. त्यापैकी आम्ही भाजपला एकहाती 5 जागा निवडून आणत असू. मी संघर्ष केला परंतु कोणाविषयी द्वेष मनात ठेवला नाही. गेल्या 40 वर्षात राजकारण करतोय परंतु कोणत्याही महिलेला समोर करून कोणावर नको ते आरोप केले नाही. षडयंत्र करून माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले गेले. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकलं.राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. मला अडचणीत आणण्यासाठी रोहिणीताईंना न मागता अचानक टिकीट देण्यात आले''. असे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेशावेळी म्हटले.

 

खडसे पुढे बोलताना म्हणाले की,''पवार साहेब मी तुम्हाला आश्वासन देतो की, जेवढ्या आत्मतियेने आणि एकनिष्ठेने मी भाजप साठी काम केले तेवढ्यात आत्मतियेने मी राष्ट्रवादीचे काम करेन. उत्तर महाराष्ट्रात जेवढी भाजप वाढली त्याच्या दुप्पट वेगाने मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेन आणि त्यांनी मला ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांची सीडी लावेन''

साथ हवीये आपल्या लोकांची, पाठीशी आपल्यासारख्या मार्गदर्शकांनी भक्कमपणे उभे राहावे. असे म्हणताना एकनाथ खडसेंना गहिवरून आले. 

या पदाला नकार दिल्यामुळे खडसेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

आता पक्ष सोडला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. नाथाभाऊंची ताकद काय आहे हे दाखवून देणार, असे म्हणत पवार साहेबांना जळगावला येण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्या सारखं वाटलं. 

त्यांच्यावर झालेल्या भूखंडाच्या आऱोपवर त्यांनी म्हटले की, ''माझ्यावर भूखंडाच्या चौकशा लावल्या, जरा काही दिवस जाऊद्या, कोणी किती भूखंड घेतले हे तुम्हाला दाखवीन''

आपल्या भाषणाचा समारोप करताना खडसे यांनी, पवार साहेबांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criticism on ED of Eknath Khadse while joining NCP