विद्यार्थांनो इकडे लक्ष द्या! पदवी अभ्यासक्रमाचा कटऑफ वधारला; 'या' शाखेसाठी प्रवेश खडतर

तेजस वाघमारे
Thursday, 6 August 2020

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता.6) जाहीर झाली. या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा कट ऑफ पाच ते सात टक्क्यांनी वधारला आहे.

 

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता.6) जाहीर झाली. या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा कट ऑफ पाच ते सात टक्क्यांनी वधारला आहे. त्यामुळे विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थांचा प्रवास खडतर रहाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा पारंपरिक अभ्यासक्रमांचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींच्या सुपाऱ्यांवर पडले पाणी...

बारावीचा निकाल यंदा चांगला लागला आहे. यामुळे नव्वदीपार विद्यार्थ्यांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातच इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या परीक्षा कधी होणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ आता पाच ते सात टक्क्यांनी वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. इंजिनीअरिंग तसेच मेडिकल शिक्षणाची निवड करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षा कधी होणार, प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने पुढील शिक्षणाबाबत ते दिशाहीन आहेत. दरवर्षी बारावीची परीक्षा झाल्यावर महिनाभराच्या कालावधीत इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमांसाठी राज्याची प्रवेश परीक्षा होते. तर, राष्ट्रीय पातळीवर इंजिनीअरिंगसाठी जेईई आणि नीट ही परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा या सर्व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षाही नेमक्या कधी होतील, हे अद्याप सांगता येत नाही. यामुळे विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा बीएसस्सी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवले आहेत. यामुळे विज्ञान शाखेचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढलेला दिसत आहे. याचबरोबर नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढल्याने ही कट ऑफ वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 

कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींच्या सुपाऱ्यांवर पडले पाणी...

कला शाखेलाही पसंती
मागील काही वर्षात विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल वाढला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात सर्व नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केल्याने हा टक्का वाढलेला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व, पारंपरिक शिक्षणासोबत अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी मिळणारा वेळ, असंख्य नव्या संधी यामुळे हा बदल घडताना दिसत आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cutoff of degree courses has increased and the journey of science has been tough