Cyrus Mistri Accident : कार कोण चालवत होते? ‘रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyrus Mistri Accident

Cyrus Mistri Accident : कार कोण चालवत होते? ‘रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात

मनोर पालघर : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी येथे झालेल्या अपघतात उद्योगपती सायरस मिस्त्रींचा मृत्यू झाला असून या अपघातात आता नवी माहिती समोर आलीये. मिस्त्रींची कार एक महिला चालवत होती. तर अपघातात जीव गमावणारे सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल हे दोघे कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिलीये.

रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चारोटी गावच्या हद्दीत घोळ येथील सुर्या नदीच्या पुलावर मर्सिडिज कारचा अपघात झाला. या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

कारमध्ये होते चार जण

अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार जण होते. कार अनायता पंडोल या चालवत होत्या. तर देरियल पंडोल या त्यांच्या बाजूच्या सीटवर होते. तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल हे दोघे मागच्या सीटवर बसले होते. हे चौघे गुजरात उधंवाडावरून मुंबईकडे जात असताना पुलावर हा अपघात झाला.

नियंत्रण सुटल्याने अपघात?

घोळ येथील सुर्या नदी पुलावर चालकाचा अंदाज चुकल्याने पुलाच्या कठड्याला कार धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वर्तवली.

जखमींवर गुजरातमधील रुग्णालयात उपचार

अपघातातील जखमींना वापी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून गुजरातमधील रेनबो रुग्णालयात हलवण्यात आले. तर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. मिस्त्री यांचे पार्थीव हवाई मार्गाने मुंबईला नेण्यात येईल, असे समजते.

रस्त्याची दुरावस्था

चारोटी उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील उतारावर तीन मार्गिका असताना काही मीटर अंतरावरच्या सुर्या नदीवरील पुल सुरु होण्याआधी डाव्या बाजूची एक मार्गिका कमी होऊन दोनच मार्गिका शिल्लक आहे. याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचे सांगितले जाते. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय.

‘सूचना फलकच नाही’

चारोटी उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील उतारावर तीन मार्गिका असलेला रस्ता सुर्या नदीच्या पुलाच्या सुरुवातीला काही मीटर अंतरावर दोन पदरी होतो. महामार्गाची एक मार्गिका संपत असल्याचे कोणताही सूचना फलक आणि सुरक्षा उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडून करण्यात आली नाही. त्यामुळे डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना सायरस मिस्त्री यांची कार सुर्या नदीच्या पुलाला धडकून झालेल्या अपघातात प्रतिथयश उद्योजक प्राणाला मुकला आहे .महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेला कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे.

-हारबनन्स नन्नाडे,सदस्य,महामार्ग प्रवाशी संघटना

Web Title: Cyrus Mistry Dies In Road Accident Palghar Jehangir Pandole Anahita Driving Car Surya River Bridge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accident case