दाभोलकर हत्या प्रकरण! घटनेत वापरलेल्या कथित हत्याराचा बॅलेस्टीक अहवाल अद्यापही प्रलंबित

सुनिता महामुणकर
Tuesday, 20 October 2020

सात वर्षापूर्वी झालेल्या विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून यामध्ये वापरलेल्या कथित हत्याराच्या बॅलेस्टीक अहवालाची प्रतिक्षा अजूनही सीबीआयला आहे.

मुंबई : सात वर्षापूर्वी झालेल्या विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून यामध्ये वापरलेल्या कथित हत्याराच्या बॅलेस्टीक अहवालाची प्रतिक्षा अजूनही सीबीआयला आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यापासून हा अहवाल प्रलंबित आहे.

मास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य सरकारला अहवाल सादर

पुण्यात दाभोलकर यांची सकाळच्या सुमारास अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेल्या घटनेला आता सात वर्षे झाली आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून मुंबई उच्च न्यायालयात वेळोवेळी तपासाचा सीलबंद अहवाल दाखल केला जातो. पोलिसांना अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येमध्ये जे पिस्तौल वापरले होते, त्याचे सुटे भाग करुन ठाण्याजवळील खाडीत आरोपींनी फेकले होते. हे सुटे भाग मिळवण्यासाठी परदेशी गोताखोरांची मदत तपास यंत्रणेने घेतली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोताखोरांना खाडीमध्ये मिळालेले अवशेष फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातून या हत्या प्रकरणात हे हत्यार वापरले होते का? यावर माहिती मिळू शकेल. मात्र सहा महिने होऊनही त्याचा बैलेस्टीक अहवाल अद्यापही तपास यंत्रणेला मिळालेला नाही. हा अहवाल लवकर देण्याचे निर्देश सीबीआयकडून देण्यात आले आहेत. हत्याराचे काही अवशेष मिळाले आहेत मात्र ते या गुन्ह्याशी संबंधित आहेत का हे तपासायचे आहे, असे सीबीआयने यापूर्वी सांगितले आहे.

सरकारी यंत्रणा असताना पालकमंत्री कक्षाची गरज काय? दरेकर आणि तटकरेंमध्ये खडाजंगी

लॉकडाऊनमध्ये आणि आताही या तपासाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. त्यामुळे तपासाबाबत अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे. दाभोलकर यांची हत्या 20 औगस्ट 2013 मध्ये झाली होती. कौम्रेड गोविंद पानसरे (फेब्रुवारी 2015), एम एम कलबुर्गी ( औगस्ट 2015, कर्नाटक ) तर पत्रकार गौरी लंकेश (सप्टेंबर 2017) यांंच्या हत्येची पद्धती दाभोलकर हत्येप्रमाणेच होती. यामध्ये वापरलेल्या चार पिस्तौलचे अवशेष एका अटक आरोपीने खाडीत फेकले, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा अहवाल चारही हत्यांच्या तपासासाठी महत्वपुर्ण ठरू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabholkar murder case The ballistic report of the alleged killer used in the incident is still pending