कासा : भिकाऱ्याचा दानशूर व्यक्तीला सोन्याची नाणी भासवून १० लाखांचा गंडा | Dahanu crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money fraud

कासा : भिकाऱ्याचा दानशूर व्यक्तीला सोन्याची नाणी भासवून १० लाखांचा गंडा

कासा : पैशांच्या हव्यासापोटी फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. डहाणूतही (Dahanu) असाच प्रकार घडला असून, एका भिक्षेकऱ्याने बोरिवलीतील दानशूर व्यक्तीस पितळेची नाणी सोन्याची भासवून (fake gold coins) तब्बल १० लाखांचा गंडा (ten lac fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दानशूर व्यक्तीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सापडला नाही. अखेर रविवारी (ता. १४) त्यांनी याप्रकरणी डहाणूतील कासा पोलीस ठाण्यात (Kasa Police station) तक्रार दाखल (police complaint) केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसी टीव्हींच्या (CCTV footage) साह्याने चोरट्यांचा शोध सुरू (thief investigation) केला आहे.

हेही वाचा: मुंबई : प्रभाग पद्धतीबाबत भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे निर्देश

बोरिवलीतील एक दानशूर व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून डहाणूतील महालक्ष्मी माता मंदिरात दर्शनासाठी येत आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांना ही व्यक्ती प्रत्येकी २० रुपये वाटत होती. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती भिक्षेकऱ्यांना पैसे वाटत असताना एकाने आपल्याकडील जुने नाणे या व्यक्तीस देऊन, या जुन्या नाण्यांचा मला उपयोग नाही, तुम्ही ही नाणी ठेवा असे सांगितले. त्यानंतर ही व्यक्ती बोरिवली येथील घरी निघून गेली. त्याच रात्री राजू नामक भिक्षेकऱ्याने या व्यक्तीस मोबाईलवरून संपर्क करून नाणे तपासून पाहण्यास सांगितले. या व्यक्तीने ते नाणे सोनाराकडे तपासले असता ते सोन्याचे निघाले.

त्यामुळे या व्यक्तीने राजूला संपर्क केला. त्याने माझ्याकडे अशी अनेक नाणी आहेत ती तुम्हाला देईन असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती महामार्गावरील चारोटी नाका येथील सेवा रस्त्यावर राजूला भेटली. राजूने त्यांना दोन थैल्यांमधून पाच-पाचची नाणी दिली. ही नाणी घेऊन दानशूर व्यक्ती पुन्हा सोनाराकडे गेली असता ती सोन्याची असल्याचे लक्षात आले. दानशूर व्यक्तीने राजूला संपर्क साधून नाणी मी विकत घेईन, असे सांगितल्यानंतर राजूने ही नाणी खोदकामात मला सापडली आहेत, त्यामुळे किलोला एक लाख रुपयेप्रमाणे विकत घेण्याचे ठरले.

ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी चारोटी हद्दीत सायंकाळच्या वेळी ही दानशूर व्यक्ती नाणी घेण्यास आली असता एक वृद्ध, एक महिला व राजू भिकारी अशा तिघांनी या व्यक्तीला १० किलो नाणी १० लाख रुपयांना विकली. या व्यक्तीने ही नाणी सोनाराकडे तपासणीसाठी नेली असता ती पितळेची निघाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यावर राजूला त्यांनी संपर्क करण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला असता तो सापडला नाही. अखेर रविवारी (ता. १४) या दानशूर व्यक्तीने कासा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे.

loading image
go to top