esakal | दहीहंडी उत्सवावर महापुराचे सावट 
sakal

बोलून बातमी शोधा

रामशेठ ठाकूर स्‍कूलमध्ये बालगोपाळांनी दहीहंडी उत्‍साहात साजरी केली. 

अनेक मंडळांचे कार्यक्रम रद्द; पूरग्रस्तांना मदत करण्याचा संकल्प

दहीहंडी उत्सवावर महापुराचे सावट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : पनवेल परिसरात दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे; परंतु न्यायालयाने या उत्सवाला अनेक निर्बंध घातल्याने मुंबई आणि ठाणे शहराप्रमाणेच येथील अनेक मंडळांनी दोन वर्षांपूर्वीच माघार घेतली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दहीहंडी उत्सव मंडळांनी याकरिता येणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा संकल्प केला. त्यामुळे या वर्षी दहिहंडी उत्सवावर जाचक अटींसह महापुराचे सावट असल्याने परिसरात निरुत्साह दिसत आहे.

कोल्हापूर, सांगली; तसेच कोकणातील काही भागात महापूर आल्याने हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाण जीवित आणि वित्तहानी झाली. आपल्या राज्यातील काही जिल्हे हे महाप्रलयाच्या सावटाखाली असताना या परिसरात दहीहंडी उत्सवावर खर्च करणे सयुक्तिक नसल्याचे मत अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्यानुसार पनवेल परिसरातील महत्त्वाच्या दहीहंडी उत्सव मंडळाने यंदा खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे व खारघरमध्ये सार्वजनिक दहीहंडी उत्सव करणाऱ्या मंडळांची संख्या २५ वर येऊन ठेपली आहे; तर या वर्षी आठ ते दहा मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १० मोठ्या दहिहंडी फोडण्यात येणार असून त्‍यासाठी ९ लाख २१ हजार ७२१ रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उत्सवाची परंपरा कायम ठेवण्याकरिता काही मंडळे हंडी उभारणार आहेत; परंतु त्यांचे थर; तसेच बक्षिसांच्या रकमा कमी करण्यात आल्या आहेत. पनवेलमध्ये सुमारे ४२५ खासगी तसेच ग्रामीण भागामध्ये सुमारे २०० च्या आसपास खासगी दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने केले जातील.  

loading image
go to top