२२ हजार हेक्‍टर भातपिकाचे नुकसान

२२ हजार हेक्‍टर भातपिकाचे नुकसान
२२ हजार हेक्‍टर भातपिकाचे नुकसान

अलिबाग : मुसळधार पावसामुळे रायगडमधील शेतकऱ्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. यावर्षीच्या खरीपात उशीराने सुरू झालेली भातलावणी, त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसाने कुजलेली रोपे, परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने २२ हजार ३९९ हेक्‍टर भात क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ हजारांहून अधिक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.  

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पडण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पेरणीची कामे पूर्ण होऊन रोपेही चांगली मोठी होऊ लागली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. त्यात जनजीवन विस्कळित होत असताना, भातपिकांवरही त्याची झळ बसली. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पडलेल्या पावसात १६ हजार ५३४.१२ भातपीक क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात ५० हजार ७२१ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. एकूण ३३ कोटी ५८ लाख ९२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. त्यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खरीप पिकाखालील १६ हजार ३९४. ६४ हेक्‍टर, बागायती पिकाखालील १३९.४८ हेक्‍टर, तर फळ पिकाखालील ३६.८९ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यामध्ये अवेळी पाऊस जिल्ह्यात बरसला. या वेळी परिपक्व झालेली भाताच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कापणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले. या पावसात प्राथमिक अहवालानुसार, पाच हजार ८६४.९० हेक्‍टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. यातील दोन हजार ९९३.६० हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली आहेत. जुलैपासून आतापर्यंत पडलेल्या पावसात एकूण २२ हजारांहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

अशी दिली जाते भरपाई
तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यामार्फत भात नुकसानीचे पंचनामे केले जातात. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास त्याला सरकारकडून भरपाई दिली जाते. हे पंचनामे तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या संयुक्त सहीने नुकसानीचा अहवाल जिल्हा पातळीवर सादर केला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या सहीने सरकारकडे दिला जातो. मग सरकारकडून निधी मंजूर होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा निधी पाठवला जातो. त्‍यानंतर तो तालुकास्तरावर तहसीलदारांकडे मग तो प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्‍या खात्यात जमा केली जातो.

जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भातपिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. या पावसात पाच हजारांपेक्षा अधिक भातपीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. निम्म्या क्षेत्राचे पंचनामे झाले असून, महिन्याभरात पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवाल सरकारला पाठवण्यात येईल. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com