ट्रकच्या धडकेने रे रोडच्या पुलाला धोका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

रे रोडवर असणाऱ्या पुलाच्या खांबाला बुधवारी (ता.11) ट्रकने धडक दिल्याने या पुलाचा खांब उखडला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवर असणाऱ्या पुलाच्या खांबाला बुधवारी (ता.11) ट्रकने धडक दिल्याने या पुलाचा खांब उखडला आहे. त्यामुळे पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे. या दुघर्टनेनंतर तत्काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल बंद करण्यात आल्यामुळे त्यावरून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या पुलाच्या पाहणीसाठी महापालिकेने तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिटरची नेमणूक केली असून लवकरच या पुलाचा अहवाल मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. या अहवालात जर पुलाचे काम करणे आवश्‍यक असल्यास तातडीने कामाला सुरुवात केली जाईल; परंतु तोपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाच ही दुघर्टना घडल्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. 

रे रोड येथील रेल्वेपुलाखालून जाणाऱ्या एका भरघाव ट्रकने दुपारी 1 वाजता धडक दिली. या धडकेमुळे पुलाचा लोखंडी खांब वाकून उखडला गेला. त्यामुळे या पुलालाच धोका निर्माण झाल्याने तत्काळ या रस्त्यांवरील; तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

परंतु या पुलावरील अनधिकृत झोपड्यांमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडत होते. मात्र आता या अपघातामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याचे काम स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार याची दुरुस्ती करण्यात येणार होती; परंतु या अपघातानंतर तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिटरची नेमणूक करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to the bridge of Ray Road due to a truck collision